Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना पाठिंबा; शिवडीचं तिकीट कन्फर्म?, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवडी विधानसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काल (23 ऑक्टोबर) 65 उमेदवारांची पहिली यादी सोशल मीडियाद्वारे जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच ठाकरेंकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुंबईतील चर्चेत असणारा शिवडी विधानसभेतून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, यावर उद्धव ठाकरेंनी अजूनही निश्चित न केल्याचं दिसून येत आहे.
ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिवडी विधानसभेचं (Shivadi Assembly Constituency) नाव नाहीय. त्यामुळे शिवडीची उमेदवारी कोणाला?, विद्यामान आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) की सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांना याबाबत आज उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज दुपारी 3 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. शिवडीतील सर्व महत्वाचे पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थितीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी देखील उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी आणि सुधीर साळवींना मातोश्रीवर बोलावून शिवडी मतदारसंघाबाबत चर्चा केली होती. यावेळी दोघंही माघार घ्यायला तयार नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना पाठिंबा-
शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. दरम्यान, शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुधीर साळवींना का मिळू शकतं तिकिट?
सुधीर साळवी हे 1992 सालापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं एकनिष्ठेनं काम करत आहेत. 2005 साली राजापूर येथील पोट निवडणुकीमध्ये नारायण राणे समर्थकांसोबत झालेल्या महाराणीमध्ये सुधीर साळवींवर गुन्हा दाखल झाला होता. लालबाग, परळ, काळाचौकी व शिवडीसारख्या भागात पक्षाचा भगवा फडकवत ठेवण्याचं काम सुधीर साळवीनी केलं आहे. कट्टर शिवसैनिकासोबतच जगप्रसिद्ध असलेल्या हिंदूत्ववादी “लालबागचा राजा” गणपती मंडळांचे ते “मानद सचिव” आहेत. कट्टर हिंदूत्ववादी लालबागचा राजा या मंडळांमुळे अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती व राजकारणी लोकांशी चांगला संपर्क आहे ज्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. ठाकरेंची शिवसेना आणि लालबागचा राजा मंडळांच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातल्या गरजूंना मदतीचा हात दिला. वैद्यकीय क्षेत्रात लालबामधील ग्लोबल रुग्णालयात ट्र्स्टी म्हणून काम करतात. तर शैक्षणिक क्षेत्रात एमडी कॅालेजच्या संचालक मंडळात सुधीर साळवी आहेत.सुधीर साळवींची राष्ट्रीय दर्जांचे कबड्डीपटू अशी ओळखही आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना निवडून आणण्यामध्ये लोकसभा समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.