Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election : लोकसभेची रणधुमाळी 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदार संघासह देशभरातील 96 लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज 10 राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Voting) नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा मतदारसंघ आणि तेलंगाणातील 17 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या विधानसभेसाठी 175 जागांवर मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघ, उत्तर प्रदेशातील 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील 8, बिहारमधील 5, ओडिशा आणि झारखंडमधील 4 आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.
दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात
उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, बेगुसरायमधून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, उजयरपूरमधून नित्यानंद राय, बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी, कृष्णनगरमधून महुआ मोईत्रा, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेशातून कडप्पा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या वायएस शर्मिला हे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात आहेत.
उत्तर प्रदेशात कन्नौजमध्ये अखिलेश यादव यांच्यापुढे भाजपच्या सुब्रत पाठक, उन्नावमध्ये साक्षी महाराज यांच्याविरोधात सपाच्या अन्नू टंडन, बिहारमध्ये ललन सिंह यांच्या विरोधात कुारि अनिता मुंगेर लोकसभा मतदारसंघात आमने सामने आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षाच्या शांभवी चौधरी या देशातील सर्वात तरुण उमेदवार असून वयाच्या 25 वर्षी त्या काँग्रेसचे सन्नी हझारी यांच्याशी लढत आहेत.
महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिरुरमधून अमोल कोल्हे, मावळमधून श्रीरंग बारणे, अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित,छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेच्या रिंगणात कोण?
जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव, मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय वाघेरे,अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे निलेश लंके, शिर्डीत सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते , रावेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचं रक्षा खडसेंना आव्हान असेल. हिना गावित यांच्या समोर काँग्रेसच्या गोवाल पाडवी, छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेनेकडून संदिपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात आहेत. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशातील 23 राज्यं आणि केंद्रशासीत प्रदेशातील प्रक्रिया पूर्ण होईल.
संबंधित बातम्या:
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल