एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूर ग्रामीण मतदारसंघ | एकाच तालुक्यात देशमुखाचे दोन वारसदार मैदानात
लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. आजवरच्या दोन्ही निवडणुकात इथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असले तरी पुन्हा त्यांना तिकीट मिळण्याची खात्री नाही. या मतदारसंघातून देशमुख परिवारातील धीरज देशमुख इच्छुक आहेत.
लातूर ग्रामीण हा मतदार संघ 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झाला आहे. आधी शिवराज पाटील आणि नंतर विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूरवर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. 1972 आणि 1978 मध्ये चाकूरकर आणि 1980 पासून आजपर्यंत विलासराव देशमुख यांचा प्रभाव आहे. मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्याचा ग्रामीण भागावर प्रभाव आहे. यामुळे या मांजरा नदीच्या पट्ट्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याचं जाळं तयार झालं आहे. त्याचे आर्थिक हितसंबंध या कारखान्याशी आणि पर्यायाने देशमुख परिवाराच्या राजकारणाशी जोडले गेले आहेत. या मतदार संघाच्या निर्मितीनंतर पहिल्यादा देशमुखांनी येथे वैजनाथ शिंदे (2009) यांना उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. त्यानंतर त्र्यंबक भिसे (2014) यांना उमेदवारी देण्यात आली, तेही निवडून आले.
आता लातूर ग्रामीणमधून विलासरावांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ देशमुख परिवाराने स्वत:च्या राजकारणासाठी राखीव ठेवला आहे. यामुळे दोन टर्म मध्ये त्यांनी दोन उमेदवार दिले. त्यांचं पक्षातलं नेतृत्वही स्थिर होऊ दिले नाही. चाकूरकर, निलंगेकर आणि देशमुखांच्या प्रभावातून हा भाग हळूहळू मुक्त होत असून सध्या ग्रामीण मतदारसंघही धोक्याचा इशारा देत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता, माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि विद्यमान आमदार त्रिम्बक भिसे यांची राजकीय कोंडी करून धीरज देशमुख यांनी स्वतःच्या उमेदवारीचे घोडे दामटण्याने मतदार संघात अस्वस्थता आहे. एकाच तालुक्यातील दोन मतदार संघात एकाच घरातल्या दोघांची आमदारकी बळकावण्याच्या डावपेचाने शिंदे आणि भिसे समर्थकांसह एकूणच काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
या मतदारसंघात मराठा, वंजारी, बंजारा आणि लिंगायत समाज संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखाने आणि विविध कार्यकारी सोसायट्यांवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. रेणा, विकास आणि मांजरा साखर कारखान्याचं उत्तम प्रशासन आणि रोखीच्या व्यवहाराने देशमुखाची बाजू भक्कम मानली जात आहे. मात्र मागील काही वर्षातल्या सततच्या दुष्काळामुळे सहकार क्षेत्रातील अर्थकारणाला तडे जात आहेत. पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. साखर कारखान्याशिवाय अन्य उद्योग व्यवसाय नसल्याने आर्थिक स्तर वाढत नाही. पाण्याअभावी शेती पिकत नाही. यामुळे या भागात असंतोष वाढत आहे. याचा लाभ भाजपाला मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. लातूर ग्रामीणसारख्या मराठाबहुल मतदार संघात भाजपकडे सक्षम मराठा उमेदवाराचा अभाव आहे. इथे मुंडे गटाचा प्रभाव असला तरी मराठा उमेदवार दिला गेल्यास भाजप काँग्रेसवर मात करण्यात यशस्वी होऊ शकतो, यात संशय नाही. पंकजा मुंडे यांच्या इच्छाशक्तीवर विजयाचं समीकरण आणि बरंच काही अवलंबून आहे.
शिवसेना भाजपच्या पारंपरिक जागावाटपात ही जागा भाजपाची आहे. मागील दोन टर्म भाजपाचे उमेदवार रमेश कराड (मुंढे गट ) प्रचंड पैसा आणि कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करूनही पराभूत झाले. सातत्याने लोकांत राहूनही रमेश कराड जातीय समीकरणाच्या गणितात दोन्ही वेळा नापासच झाले. मागील विधान परिषद निवडणुकीत कराड यांचं वागणं मतदार संघात नाराजीचं मोठं कारण ठरलं. त्याचा परिणाम यावेळी जाणवेल, अशी चिन्हे आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा फायदा तोटा
मुस्लिम आणि दलितांची संख्या इतर समाजाच्या मानाने कमी आहे. मात्र, हा मतदार संघ मराठाबहुल असल्याने वंचित बहुजनचा निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासारखी स्थिती या ठिकाणी नाही. मात्र भाजपाला वंचितची लीड मदत करणारीच राहील.
2014 विधानसभा निवडणूक निकाल
काँग्रेस - त्र्यंबक भिसे (100798)
भाजप - रमेश कराड (90387)
शिवसेना - हरिभाऊ साबदे (3085)
राष्ट्रवादी - आशा भिसे (2672)
इतर सर्व मिळून( ८५०० )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement