Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान, तर काँग्रेस आघाडी घेणार का?
मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्या सर्व जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.
![Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान, तर काँग्रेस आघाडी घेणार का? If BJP is challenged to retain power in Manipur, will Congress take the lead? Manipur Election Result 2022 : मणिपूरमध्ये सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान, तर काँग्रेस आघाडी घेणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/10/e807f0343f5a20363af367dc28a886af_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manipur Election Result 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामध्ये मणिपूर राज्याचा देखील समावेश आहे. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्या सर्व जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. त्यामुळे सत्तेत कोण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. 60 जागांसाठी मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजप युतीला 23 ते 27 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला 12 ते 16 जागा मिळू शकतात, तर एनपीएफला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल. एनपीपीला 10 ते 14 जागा मिळतील. तर 2 ते 6 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. तर 5 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली होती. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी 78.03 टक्के मतदान झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, आज मणिपूरसह गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तरखंड या राज्यांचे निकालही आजच जाहीर होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर काही तासातच राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)