एक्स्प्लोर
तोंडी परीक्षा : महाआघाडीत मनसेला स्थान नाही : अशोक चव्हाण
'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या विशेष कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीशी चर्चा, मनसे-एमआयएमला महाआघाडीत न घेण्याचं कारण, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, सुजय विखे पाटील यांची उमेदवारी अशा विविध प्रश्नांवर उत्तरं दिली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांच्या पक्षाचे विचार काँग्रेसशी जुळत नाही, त्यामुळे महाआघाडीत मनसेला स्थान नको, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुन्हा स्पष्ट केलं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला आपल्या कोट्यातील एक जागा दिल्याची फक्त चर्चा आहे. त्याची अधिकृत माहिती काँग्रेसपर्यंत अजून आलेली नाही. त्यामुळे शेवटपर्यंत मनसेला महाआघाडीत घेण्यास आमचा विरोध असेल, असं ठाम मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात येतील त्यांना सोबत घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधी भूमिकेमुळे मनसेच्या आघाडीप्रवेशाला खीळ बसू शकते.
वंचित बहुजन आघाडीशी चर्चा, एमआयएमला महाआघाडीत न घेण्याचं कारण, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, सुजय विखे पाटील यांची उमेदवारी अशा विविध प्रश्नांवर अशोक चव्हाणांनी उत्तरं दिली.
भाजप आणि शिवसेनेला 2014 च्या निवडणुकीत 30 टक्के मतदान झालं होतं. तर भाजप विरोधात असणाऱ्या पक्षांना 70 टक्के मतदान झालं होतं. मात्र भाजप सत्तेवर आलं, याचं कारण भाजप विरोधात असणारे पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचा फायदा शिवसेना-भाजपला झाला. म्हणून यावेळेस महाराष्ट्राचा विचार समोर ठेवून महाआघाडी करण्याचं ठरवलं, असं अशोक चव्हाण म्हणाले.
भाजप पुलवामा हल्ला आणि भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे, असा घणाघातही अशोक चव्हाणांनी केला. भाजप शिवसेनाचा पराभव करणं हा मूळ उद्देश असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं.
VIDEO | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
वंचित बहुजन आघाडीसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला कायद्याच्या चौकटीत आणणं या मुद्द्यावर आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत आहोत, असं अशोक चव्हाण म्हणाले. वंचित आघाडीने 22 जागा मागितल्या आहेत, त्यात नांदेड, माढा आणि बारामती या मतदारसंघांचा समावेश आहे. मागणी रास्त असायला पाहिजे, जर 22 जागा त्यांना दिल्या, तर महाआघाडीतील इतर पक्षांना किती जागा द्यायच्या आणि आम्ही किती लढायाच्या? आम्ही फक्त प्रचाराला शिल्लक राहू, असा खोचक टोला अशोक चव्हाणांनी लगावला.
एमआयएम आणि मनसेशी आमचे विचार जुळत नाहीत. राज ठाकरे यांच्याशी आपले चांगले संबंध असले तरी त्यांच्या पक्षाचे विचार आमच्याशी मिळतेजुळते नाहीत. म्हणून महाआघाडीत मनसे आणि एमआयएम या पक्षांना स्थान नाही, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीने मनसेला आपल्या कोट्यातील एक जागा दिल्याची चर्चा आहे. मात्र तशी अधिकृत माहिती काँग्रेसपर्यंत अजून आलेली नाही. शेवटपर्यंत मनसे आणि एमआयएमला महाआघाडीत घेण्यास आमचा विरोध असेल, असं ठाम मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
सुजय विखे पाटील हे आमच्या पक्षातील मेरिटचे उमेदवार आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी, असं आपल्याला मनापासून वाटतं. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र त्याबाबत अजून चर्चा सुरु आहे. मला असं ठाम विश्वास आहे की सुजय जिंकणारा घोडा आहे. त्याला संधी मिळाली तर तो नक्कीच जिंकेल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाणांनी दिल्लीत काम केलं आहे. त्यामुळे ते अगदी संथ गतीने काम करतात, मात्र आम्ही काम करताना तातडीने काम करतो, असं अशोक चव्हाण म्हणाले.
सविस्तर उत्तरे द्या
अशोक चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 6
संदर्भासहित स्पष्टीकरण
आदर्श घर- हा शब्द माझ्या जीवनाला कलाटणी देणारा शब्द
नागपुरातील शाईफेक- दुर्देवी घटना आहे, मात्र अशा आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जायला पाहिजे आणि मी सामोरे गेलो.
अशोक चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7
योग्य पर्याय निवडा
1- कोणते उद्धव ठाकरे तुम्हाला खरे वाटतात?
अ. स्वबळाची भाषा करणारे
ब. सत्तेला चिटकून राहणारे
उत्तर- ब. सत्तेला चिटकून राहणारे
2- कुणासोबत डील करणं सोपं गेलं?
अ. शरद पवार
ब. अजित पवार
उत्तर- शरद पवार
3- अपेक्षाभंग कुणी केला?
अ. विलासराव देशमुख
ब. पृथ्वीराज चव्हाण
उत्तर- आमचं नातं विश्वासाचं होतं, त्यामुळे अपेक्षाभंगाचा विषय येत नाही
अशोक चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7
कल्पना विस्तार
1. राज ठाकरे-
(अ) वैयक्तिक मित्र (ब) महाराष्ट्रातील मोदी विरोधातील मोठा आवाज (क) राजकीय अस्पृश्य असणारा नेता
उत्तर- वैयक्तिक मित्र
अशोक चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8
एका वाक्यात उत्तरे द्या
1. गुजरात मॉडेल सारखं नांदेड मॉडेल घेऊन निवडणुकीत समोरे जालं का?
उत्तर - नांदेडचंच का, राज्याचं विकास मॉडेल आम्ही समोर ठेऊ
2. भविष्यात राजकारणामध्ये मुलांना आणाल का?
उत्तर- हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनीच याबद्दल निर्णय घ्यावा
3. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांशिवाय कोणाचाच साखर कारखाना चालत नाही, असं का?
उत्तर- आम्ही इतरांचे कारखाने चालू नये यासाठी काही करत नाही.
अशोक चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7
अशोक चव्हाण यांना मिळालेले एकूण गुण : 50 पैकी 35
तोंडी परीक्षा : पर्रिकरांकडून मोदींना ब्लॅकमेल, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
तोंडी परीक्षा : शिवसेनेच्या यूटर्नबाबत अनिल परब काय म्हणतात?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement