एक्स्प्लोर
उस्मानाबादेतून तिकीट कापल्यानंतर रवींद्र गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री शिवसेनेचे उस्मानाबादेतील विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड पोहचले. या बैठकीत गायकवाड यांना न्याय देण्याचं आश्वासन चर्चेनंतर देण्यात आलं.

मुंबई : लोकसभेसाठी तिकीट डावलल्याचा रोष निवडणुकांमध्ये महागात पडू शकतो. हेच लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेतून तिकीट नाकारलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली. 'वर्षा'वर काल मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरु होती.
'मातोश्री'वर काल दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र गायकवाडांची समजूत काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मध्यरात्री गायकवाड पोहचले. बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचं आश्वासन बैठकीतील चर्चेनंतर देण्यात आलं.
उस्मानाबादेतून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गायकवाडांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांबरोबर राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालघरबाबत चर्चा झाली. शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांचं नाव घोषित होण्याची दाट शक्यता आहे.
'मातोश्री'वर आज दुपारी राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्यात भेट होणं अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वनगा यांना 'मातोश्री'वर बोलावून निर्णयाची कल्पना दिली होती.
आणखी वाचा




















