Nilesh Rane : पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result : विजयी निवडणुकीत उदय सामंत का दिसले नाहीत असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यावर उदय सामंत यांनीही उत्तर दिलं आहे.
मुंबई : राज्यातील लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येतंय. महायुतीत पहिली ठिणगी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पडली असून खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं असं निलेश राणे म्हणाले. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही असं सांगत राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला.
उदय सामंत यांच्या मतदारसंघात राणे पिछाडीवर
पालकमंत्री असून देखील उदय सामंत आम्हाला लीड देऊ शकले नाहीत असा आरोप करत निलेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. निलेश राणे म्हणाले की, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत.
सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विजयी मिरवणुकीतही उदय सामंत दिसले नाही, ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे म्हणाले.
किरण सामंतनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा दावा निलेश राणे यांनी केला. त्याचे आपल्याकडे पुरावे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती देणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.
मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही: उदय सामंत
निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी खात्री करावी. याबाबत काही तक्रार असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याची तक्रार करावी. देवेंद्र फडणवीस योग्य ते बोलतील.
मला वाद वाढवायचा नाही
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राजापूरसह रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार चर्चा करतील. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेतेमंडळी घेत असतात. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो.
ही बातमी वाचा: