Avinash Jadhav: अविनाश जाधव यांनी राजीनामा का दिला?; बाळा नांदगावकरांनी सांगितलं कारण, पालघरमधील अंतर्गत वादावरही बोलले!
Bala Nandgaonkar On Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्या या राजीनाम्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bala Nandgaonkar On Avinash Jadhav: मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी विधानसभेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित अविनाश जाधव यांनी काल ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
अविनाश जाधव यांच्या या राजीनाम्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. अविनाश जाधव एक चांगला कार्यकर्ता आहे. पराभव त्याच्या मनाला लागला असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. यावर पक्षप्रमुख विचार करतील काय करायचं?, असं बाळा नांदगावकरानी स्पष्ट केलं. दरम्यान बाळा नांदगावकरांना देखील शिवडीमधून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावर त्यांना विचारले असता निवडणूक लढत नाही मी खेळत असतो. खेळात विजय-पराभव होत असतो. लोकांमध्ये जाऊन प्रामाणिकपणे काम करायचे, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायचे...थांबायचं नाही, थकायचे नाही, जोरात कामाला लागायचं, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
पालघमधील मनसेतील वादावर बाळा नांदगावकर काय म्हणाले?
पालघमधील मनसेतील वादावर बाळा नांदगावकरांना विचारले असता मला विषय माहिती नाही तर मी काय बोलणार...आपल्या कुटुंबामध्ये असं भांडण होणं चांगलं नाही. एकमेकांशी भांडण करून काय होणार आहे. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर-
अविनाश जाधव यांनी राजीनामा देताच पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. अविनाश जाधव यांनी याबाबत अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली . यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.