Eknath Shinde Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाण्याची शक्यता; शपथविधीआधी राजकीय हालचाली वाढणार
Eknath Shinde Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे दरे दौऱ्यानंतर काल ठाण्यात दाखल झाले आहेत.
Eknath Shinde Devendra Fadnavis: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर काल (1 डिसेंबर) सायंकाळी ठाण्यात परतले. दरेगावी गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना ताप आला होता. त्यामुळे त्यांना घरी सलाइन लावल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली. काल तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी हॅलिकॉप्टरने ठाण्याकडे रवाना झाले.
एकनाथ शिंदे दरेगावात असताना देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी फोनवर इतर राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीची लांबणीवर पडलेली बैठक लवकरच होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
मी गावी आल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो मला सर्वसामान्यांची गरिबीची जाणीव आहे. मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे, पण जनतेच्या मनामध्ये राहुन मी काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. कॉमन मॅन समजून मी काम केला आहे. कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी काल स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल याबाबत मी आधी देखील सांगितले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासन दिले आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचं मला काय मिळालं? दुसऱ्याला काय मिळालं?, हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदे यांच्या बाबत आपण पत्रकारच चर्चा करत असतात. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल. त्यामधून योग्य तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होईल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आज किंवा उद्या त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान, आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
संबंधित बातमी:
Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत; भाजपच्या मनात नेमकं काय?