एक्स्प्लोर
Advertisement
आष्टी विधानसभा मतदारसंघ : भाजपची ताकद वाढली पण तिकीट मिळणार कुणाला?
आष्टी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळचे राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री असलेल्या सुरेश धस यांचा मतदारसंघ. सुरेश धस आता भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. ते परिषदेवर असल्यामुळे त्यांना आपल्या मुलाला जयदत्त धस यांना आष्टीतून निवडून आणायचं आहे तर विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे ही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ होय. आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन तालुक्यांचा समावेश होतो त्यात आष्टी, पाटोदा आणि शिरूर हे तालुके येतात या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण तीन लाख 69 हजार 538 मतदार आहेत.. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी हा मतदारसंघ फक्त दोन म्हणजे आष्टी आणि पाटोदा तालुक्यांचा होता. मात्र 2009 नंतर यात आणखी एका म्हणजे शिरुर तालुक्याचा समावेश झाला.
या मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश धस यांना 1 लाख 18 हजार 847 मते मिळाली होती. तर भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना 84 हजार 157 मते मिळाली होती. या निवडणुकीत धस यांनी 35 हजार मतांनी विजय मिळवला.
2014 या एकाच निवडणूक वर्षात सुरेश धस हे दोन मोठ्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र यात त्यांचा सव्वा लाख मतांनी पराभव झाला..
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत होते, त्यांच्या विरोधात भाजपकडून भीमराव धोंडे हे मैदानात उतरले होते. या निवडणुकीत सुरेश धस यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला आणि भीमराव धोंडे आमदार झाले. यानंतरच्या काळात मात्र बीड जिल्ह्याच्या पक्षीय राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या..
सुरेश धस यांची भाजपशी जवळीक
2017 साली झालेल्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या. म्हणजे एकूण 60 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बीड झेडपी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. त्या खालोखाल भाजपाचे 19 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. विशेष म्हणजे सुरेश धस गटाचे पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते.
बीड झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असतानाही सुरेश धस यांनी मात्र आपल्याकडील पाच जिल्हा परिषद सदस्य हे भाजपला दिले आणि बीड झेडपीमध्ये भाजपाची सत्ता आली. या घटनेनंतर मात्र सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर वाढत गेलं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांची एकाधिकारशाही चालते असा आरोप धस यांनी केला आणि राष्ट्रवादीत बंड करून सुरेश धस भाजपमध्ये दाखल झाले.
सुरेश धस यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी
भाजपवासी झालेल्या सुरेश धस यांना भाजपाने लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली. खरं तर या मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद निर्णायक नसतानाही सुरेश धस यांनी मुसंडी मारली आणि या निवडणुकीमध्ये सुरेश धस विधान परिषदेवर निवडून गेले. सुरेश धस यांना आमदार करण्यात पंकजा मुंडे यांचा वाटा मोठा होता. आता आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन आमदार झाले. एक भाजपाच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेलेले भीमराव धोंडे आणि दुसरे भाजपाकडून विधानपरिषदेवर निवडून गेलेले सुरेश धस.
भाजपची ताकद वाढली मात्र राष्ट्रवादी एकाकी
सुरेश धस भाजपात आल्याने स्वाभाविकच आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली. मात्र या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकाकी पडली. तिकडे सुरेश धस भाजपात आल्यावर आष्टीचे भाजप नेते, बाळासाहेब आजबे राष्ट्रवादीमध्ये गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपापसातील मतभेदामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीची प्रकृती काही सुधारली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यातून तब्बल एक लाख सत्तर हजारांचं मताधिक्य मिळालं. त्यातील 70 हजार मते एकट्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती.
आष्टी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न
बीड जिल्ह्यातील पर्जन्य छायेखाली येणारा एकमेव प्रदेश म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ होय. त्यामुळे या मतदारसंघात सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र हा सोडविण्यासाठी ठोस उपाय योजना होताना दिसत नाही. कुकडीचे पाणी आष्टीला कधी येणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून कोणताही लोकप्रतिनिधी देऊ शकलेला नाही. स्वाभाविकच पाणी नसल्याने मोठे औद्योगिक प्रकल्प या भागात उभे राहिले नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर मतदारसंघाचा विचार करता सर्वाधिक पशुधन असलेला मतदारसंघ आष्टी आहे. मात्र पशुधन वाढीसाठी ठोस उपाययोजना होताना पाहायला मिळत नाही.
आष्टीसाठी जयदत्त धस यांची मोर्चेबांधणी
सुरेश धस हे विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस हे चांगलेच कामाला लागलेत. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांचा प्रचार करण्यात जयदत्त धस यांची भूमिका महत्त्वाची होती. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या नाती सोबत सुरेश धस यांचा मुलगा जयदत्त यांचा विवाह झाला. त्यामुळे धस आणि दरेकर कुटुंब एकत्र आल्याने जयदत्तला या मतदारसंघांमध्ये बळ मिळत असल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयदत्त धस हेच भाजपाचे उमेदवार असतील अशी चर्चा धसांचे कार्यकर्ते करत आहेत.
आष्टी विधानसभा मतदार संघातील जातीय समीकरणे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल ओबीसी समाजाचे मतदान आहे. यात वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असते. या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे.
भाजपा आणि राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार ?
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका तोंडावर असताना एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. तो पेच आहे राष्ट्रवादी आणि भाजपाचे तिकीट कोणाला मिळणार? भीमराव धोंडे यांनाच आमदारकीचे तिकीट मिळणार असा दावा धोंडेसमर्थक करत असताना, सुरेश धस यांचे चिरंजीव हे सुद्धा तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी देतात यावरच या मतदारसंघातील लढत ठरणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement