Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्याचे संकेत; नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde: जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आज त्यांनी मुंबईत आपल्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री असणार असे संकेत दिसू लागले आहेत.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
तुम्हाला वाटत असेल कुठं घोडं अडलं आहे. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मी लाडका भाऊ हे पद मिळवलं आहे. ही मोठी ओळख आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना मी कुठलीही अडचण आणणार नाही. मला अडीच वर्ष संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय पक्षातील अंतिम असेल. तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे असं वाटू देऊ नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोनवरून हे सांगितलं असल्यातं शिंदे यांनी म्हटलं आहे.
नाराज होऊन रडणार नाही
लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. ही ओळख सर्व पदापेक्षा मोठी वाटते. मी समाधानी आहे. नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले
भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
आज पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी माझ्या अंगातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनवर बोलताना सांगितलं आहे. एनडीएचे प्रमुख म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल. मी गृहमंत्री अमित शाह यांना देखील फोन करुन तुमचा जो निर्णय होईल, ते मान्य असल्याचे एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.