Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ, 10 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
Mumbai University Admission : कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत 10 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
यापूर्वी 27 जून पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांनी पार पडावी अशा अनुषंगाने विद्यापीठाने परिपत्रक निर्गमित केले होते. मात्र व्यापक विद्यार्थीहित लक्षात घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत 10 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर सामान्य गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचा संबंधित अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्जही भरणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























