लग्नास नकार दिल्याने तरुणीच्या ओठांना चावा, भिवंडीतील धक्कादायक प्रकार
मागील एक वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता.मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता.

भिवंडी : एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने तरुणीच्या ओठांचा चावा घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणीच्या ओठांना मोठी जखम झल्याने तिला उपचारासाठी प्रथम भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे . याप्रकरणी विकृत तरुणासह त्याच्या साथीदार मित्रांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मुक्तार अन्सारी ( रा . किडवाई नगर ) व शाहिद असे गुन्हा दाखल झालेल्या विकृत तरुणांची नवे आहेत .
मुक्तार अन्सारी याचा राहत असलेल्या परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील एक वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता. मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता. मुक्तार या मुलीला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होता . सदर मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते तसेच लग्नाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेक धमक्यादेखील दिल्या होत्या . तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती .
पीडित मुलगी बाजारात ओढणी घेण्यासाठी घराबाहेर पडली असता मुक्तारने तिला गाठले तर त्याच्या साथीदाराने मुलाला जबरदस्तीने गल्लीत ओढले व पकडून ठेऊन तिचे डोळे झाकून ठेवले व मुक्तारने जबरदस्तीने तरुणीच्या ओठांचा जोरात चावा घेतला. हा चावा एवढा भयंकर होता की त्यात मुलीचा ओठ मुलाने खेचून काढला व त्यामुळे मुलीच्या ओठाला मोठी जखम झाली आहे . जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातील शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत . दरम्यान याप्रकरणी मुक्तार व त्याचा साथीदार शाहिद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून अटक करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.























