(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : बैलगाडा शर्यतीच्या वादातून राडा; अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटात अंधाधुंद गोळीबार
Crime News : बैलगाडा शर्यतीच्या वादातून राडा झाल्यानंतर अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटांनी एकमेकांवर अंधाधुंद गोळीबार केलाय.
मुंबई : अंबरनाथ एमआयडीसीत दिवसाढवळ्या दोन गटांमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय. बैलगाडा शर्यतीच्या वादातून राडा झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरूण कारमधून उतरून अंधाधुंद गोळीबार करत आहेत. यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. गोळीबार झाल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आलाय.
पनवेलचे पंढरीशेठ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असून राहुल पाटील हे कल्याणच्या आडीवली गावात राहणारे बैलगाडा मालक आहेत. या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून बैलगाडा शर्यतीत जिंकण्या-हरण्यावरून सातत्याने वाद सुरू होते. दोन्ही गटाकडून अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांना आव्हानं दिली जात होती. त्यामुळेच कधीतरी हे दोन गट समोरासमोर येण्याची आणि त्यातून अनर्थ घडण्याची भीती बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना देखील होती. त्यामुळेच अंबरनाथमधील बोहोनोली गावात आज या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्यात समेट घडवण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीपूर्वीच अंबरनाथ एमआयडीसीत हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.
अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके हे समोरासमोर आले. यानंतर त्यांच्यात वाद होऊन पंढरीशेठ फडके समर्थकांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी तब्बल 15 ते 20 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली. सोबतच राहुल पाटील यांच्या समर्थकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली.
सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेनंतर दोन्ही गटांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र काही वेळातच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी जमले. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी 8 ते 10 टीम रवाना करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. गोळीबारानंतर व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून पुन्हा धमकी देण्यात आलीय. 24 तासात आरोपी न पकडल्यास ठाणे रायगड बंद करू, असा इशारा राहुल पाटील यांनी दिलाय.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा आरोपी पंढरीनाथ फडके याला खान्देश्वर पोलिसांनी अटक केली आहे. फडके याला अटक केल्यानंतर पोलिस पनवेल येथील उपजिल्हारूग्णालयात मेडिकलसाठी घेवून गेले आहेत.
व्हिडीओ