Thane Crime : मद्यपी दुचाकीस्वाराने वीट फेकून मारल्याने वाहतूक पोलीस जखमी
ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याने मद्यपी दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस हवालदाराच्या डोक्यात वीट मारली. यात पोलीस हवालदार नवनाथ कांदे जखमी झाले आहेत.
ठाणे : धुळवडीच्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याने वाहतूक हवालदाराच्या डोक्यात वीट टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न ठाण्यात झाला आहे. ठाण्यातील माजीवडा जंक्शन इथे काल (18 मार्च) संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यात हवालदार नवनाथ कांदे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
होळीच्या पार्श्वभूमीवर मद्यपी आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश असल्यामुळे या मोहीमअंतर्गत कांदे चालकांवर कारवाई करत होते. यावेळी एका दुचाकीवरुन भगीरथ चव्हाण (वय 40 वर्षे )आणि अनिल गुप्ता (वय 38 वर्षे) या दोघांना अडवून कांदे यांनी त्यांची तपासणी केली. हे दोघे कॅसल मिल इथून येत होते. यावेळी दोघांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यानंतर कांदे यांनी त्यांच्यावर रितसर कारवाई केली. ही कारवाई करण्यात येऊ नये म्हणून दोघांनी नवनाथ कांदे यांच्यासोबत वाद घातला. पण दंड भरुन निघून गेले.
पोलीस हवालदाराचा बदला घेण्यासाठी अनिल गुप्ता 15 मिनिटांनी परत आला आणि वादाच्या रागातून अनिल गुप्ता याने पुलाखाली पडलेली वीट उचलून कांदे यांच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात कांदे जबर जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर राबोडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस शिरतोडे यांच्या माहितीनुसार, "आरोपी अनिल गुप्ता हा हवालदार नवनाथ कांदे यांच्यावर रागावला होता. संध्याकाळी सातच्या सुमारास हवालदार चहा घेत असताना अनिल गुप्ता परत आला. त्याने जवळच पुलाखाली पडलेली वीट उचलली आणि कांदे यांच्या डोक्यात मारली. जवळ असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी अनिल गुप्ताला अडवलं. परंतु तोपर्यंत त्याने नवनाथ कांदे यांच्या डोक्यावर वीट मारली होती. कांदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनिल गुप्ता हा चहा विकणारा असून तो मद्यधुंद अवस्थेत असताना त्याला आम्ही अटक केली आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी पत्नीनं मुलीला व्हिडिओ कॉलवर न दाखवल्यानं पतीनं संपवलं जीवन!