Virar News : होळीच्या रंगाचा बेरंग; पाण्याचा फुगा लागल्यानं भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Virar News : होळीच्या रंगाचा बेरंग; पाण्याचा फुगा लागल्यानं दुचाकी आणि सायकलचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू
Virar News : तब्बल दोन वर्षांनी राज्यभरात निर्बंधमुक्त होळी (Holi 2022) खेळली जात आहे. त्यामुळे राज्यभरात उत्साह आहे. परंतु, अनेक ठिकाणी काहीजण रंगाच्या सणाचा बेरंग करत आहेत. पाण्यानं भरलेले फुगे किंवा पाण्यानं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या मारण्यावर बंदी आहे. तरीही अनेकजण रंगाच्या सणाचा बेरंग करत रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना फुगे मारताना दिसतात. पण त्यामुळे अनेकांना त्रास होतो. तर दुर्घटनाही घडतात. अशीच काहीशी घटना विरारमध्ये घडली आहे.
विरार पश्चिम आगाशी येथे धूळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्यानं दुचाकी आणि सायकलस्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतलं आहे.
विरारमधील आगाशी चाळपेठ परिसरात बूट पॉलिशचं दुकान बंद करून होळी सण साजरा करण्यासाठी घरी चाललेले रामचंद्र हरिनाथ पटेल हे या घटनेचे बळी ठरले आहेत. रामचंद्र हे सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेनं जात होते. होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या एका गाडीतून काही मुलं पाण्यांनी भरलेले फुगे रस्त्यावर फेकून मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांना लागला आणि त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. ते सायकलवरून घरी जात असलेल्य रामचंद्र यांना जावून धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन दुचाकी स्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दुचाकीस्वार हे अर्नाळा गावातील तरुण आहेत.
दरम्यान, यासंदर्भात माहिती देताना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्यानं अपघात झाला की नाही? हे स्पष्ट केलं नाही. पण चौकशी करून अपघाताचं कारण सांगितलं जाईल असं म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :