ठेकेदाराचे कर्मचारीच ठरले त्याचे हत्यारे, ठाण्यातील धक्कादायक प्रकार
ठाण्यात ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनीच पैशाच्या हव्यासापोटी मालकाची अपहरण करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे : मित्राच्या नातेवाईकांना उपचारासाठी पैसे देऊन येतो, असे आपल्या पत्नीला सांगून कोलशेत बसस्टॉपवर गेलेले ठेकेदार हनुमंत पांडुरंग शेळके यांचे पाच जणांनी अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्येनंतर एका निर्जन जागी मृतदेह त्यांनी पुरला आणि त्यानंतर खंडणीसाठी शेळके यांच्या घरी फोन देखील केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुराव्या आधारे या खुनाचा उलगडा केला आणि फोन करणाऱ्या पाच आरोपीपैकी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर तीन फरारी आरोपींच्या मागावर पोलीस पथक असल्याची माहिती परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी आज दिली.
शेळके कुटुंबीयांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबरला हनुमंत शेळके मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या शेळके यांच्या मोबाईलवरून आरोपींनी शेळके यांचे भागीदार संतोष पाटील यांना फोन करून खंडणीची मागणी केली. याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात कलम 363, 384, 387, 364(ए), 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. पोलिसांनी बनावट नोटांचे सहा लाख रुपये घेतले आणि सांगितलेल्या ठिकाणी पैसे घेऊन गेले. मात्र, खंडणीची रक्कम घेण्यास कुणीही आलेच नाही. याचवेळी फोन करताना एक चूक आरोपींनी केली आणि पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे आरोपी शिव रामलाल वर्मा (वय 24) तर दुसरा आरोपी सुरज श्रीराम वर्मा (वय 22) यांना अटक केली.
या दोघांनी चौकशीत हनुमंत शेळके यांचे ज्यादिवशी अपहरण केले, त्याच दिवशी गळा दाबून हत्या करून कोलशेत येथेच पुरल्याचे कबुल केले. त्यांचे तीन मुख्य साथीदार हे शेळके यांच्या सोबत गेले अनेक वर्षे काम करीत होते. ते फरार झाले असून त्यांच्या मागावर पोलीस पथक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली. या आरोपींनी झटपट पैसे मिळवण्याच्या उद्देशाने शेळके यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील 4 ते 5 तोळे सोने चोरले. मात्र, अजून पैसे मिळतील या आशेने त्यांनी खंडणीची मागणी केली. आणि याच हव्यासापोटी त्यांनी चूक केली आणि ते पकडले गेले. आज पोलिसांनी कोलशेत येथे पुरलेला हनुमंत शेळके यांचा मृतदेह शोधला आणि बाहेर काढला.