Raigad crime : महाडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, 6 फ्लॅट फोडले; लाखोंचा ऐवज लंपास
Raigad crime :
Raigad crime : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातलाय. महाडमध्ये चोरट्यांनी 6 फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय. महाड शहराजवळ एकाच बिल्डिंग मधील सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. या प्रकार शनिवारी (दि.30) पहाटे घडलाय. दरम्यान, चोरीच्या या घटनेनंतर महाड शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केलाय.
साई आशा इमारतीतील 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडले
अधिकची माहिती अशी की, महाड शहराजवळ किल्ले रायगड रस्त्यावरील गोंडाळे गावच्या हद्दीतील "साई आशा" या इमारतीतील सहा फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय. दरम्यान, फ्लॅट फोडल्यानंतर चोरांनी लगेच पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं स्थानिकांनी सांगितलय.
या इमारतीतील एकूण सहा कुटुंब धारकांचे फ्लॅट फोडून हे चोर पसार झालेत. चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाड पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी अखेर घरफोडी केल्याचं समोर आलंय. रायगड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून उरण मध्ये देखील अशाच घरफोड्या करून चोरट्यांनी 25 लाखांचा ऐवज चोरला होता. महाड चोरीच्या प्रकरणात देखील तपासानंतर या घरांमधून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलंय.
सहा पिस्तुल आणि 67 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना मुंबईत अटक
प्राणघातक अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी फिरत असलेल्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. पायधुनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 पिस्तुल,1 रिव्हॉलवर,3 गावठी कट्टे आणि 67 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरात प्रभू हॉटेल जवळ 3 व्यक्ती बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकांने सापळा रचून 3 आरोपींना अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या