Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Manikrao Kokate Arrest: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का ठरेल.

Manikrao Kokate Arrest: सदनिका घोटाळाप्रकरणात न्यायालयाकडून दोन वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तत्पूर्वी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणातील त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर माणिकराव कोकाटे आज मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगितले जात होते. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. परंतु, न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटून आपली बाजू मांडणार होते. मात्र, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांना पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माणिकराव कोकाटे यांचे अटक वॉरंट निघाल्यास अजित पवार त्यामध्ये हस्तक्षेप करुन मार्ग काढणार का, हे आता पाहावे लागेल. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून याविरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाऊन अटक वॉरंटला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात.
यापूर्वी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे संकटात सापडले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकांनी प्रचंड दबाव निर्माण केला होता. परंतु, अजित पवार यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्री केले होते. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्यास ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नामुष्कीची बाब ठरु शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होऊ नये, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात असल्याचे समजते. त्यामुळे आता अजित पवार हे गेल्यावेळप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा पाठीशी घालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Manikrao Kokate news: माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रात गई बात गई... पत्रकाराने 'तो' प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे म्हणाले, नवी इनिंग जोरदार खेळणार!























