Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Maharashtra New CM : महायुतीकडे भक्कम संख्याबळ असताना आता शपथविधी कुठे करायचा यावरून खल सुरू आहे. त्यासाठी आधीच्या सरकारांचा इतिहासही तपासला जात आहे.

मुंबई : राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महायुती सरकार लवकरच स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार असल्याची खात्रीलायक बातमीही आहे. पण नव्या सरकारचा शपथविधी कुठे होणार याची निश्चिती मात्र अद्याप नाही. वानखेडे स्टेडिअमवर क्रिकेट सामने असल्याने इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान आणि आझाद मैदानाचा पर्याय महायुतीसमोर आहे. पण यापैकी शिवाजी पार्कवर शपथ घेतलेल्या सरकारांबद्दलचा अनुभव मात्र वेगळा आला आहे. शिवाजी पार्कवर या आधी ज्या सरकारचा शपथविधी झाला आहे ते सरकार कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गडगडल्याचं इतिहास सांगतो. त्यामुळेच फडणवीस, शिंदे आणि दादांच्या नेतृत्वातील सरकार शिवाजी पार्कचा पर्याय अवलंबण्याचं धाडस करत नाहीत अशीच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
अनेकांच्या भाषणामुळे शिवाजी पार्क गाजलं
निवडणुकांच्या काळात अनेकांच्या भाषण गाजवणारं मैदान म्हणजे शिवाजी पार्क. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धांसह अनेक स्पर्धा भरवल्या जातात. तसेच मोठमोठ्या सभांसाठीही हे मैदान प्रसिद्ध आहे. शिवाजी पार्क आणि ठाकरे कुटुंबीयांचा एक भावनिक बंध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच मैदानावर त्यांचा दसरा मेळावा घ्यायचे. ती परंपरा पुढे उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली.
मनसेच्या राज ठाकरेंचा पाडवा मेळावा याच मैदानावर होतो. इतरही पंतप्रधानांपासून विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणांनी हे मैदान गाजतं. मात्र सरकारच्या शपथविधीच्या बाबतीत मात्र इतिहास वेगळं सांगतोय. आतापर्यंत दोन सरकारांनी शिवाजी पार्कवर शपथविधी घेतला होता आणि बहुमत असतानाही दोन्ही सरकार त्यांचा कार्काल पूर्ण करू शकलं नाही.
युती सरकारचा शपथविधी शिवाजी पार्क मैदानावर
पहिल्यांदा 1995 साली युतीचं सरकार सत्तेत आलं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांना आधीच राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. पण साडेचार वर्षातच या सरकारने राजीनामा दिला आणि निवडणुकीला सामोरं गेले. त्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महाविकास आघाडीचा शपथविधीही शिवाजी पार्कवर
दुसऱ्यांदा अशी वेळ आली ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर. 2019 साली महाविकास आघाडीचा प्रयोग करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शपथविधी घेतला. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटले आणि त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार बनवलं.
आताच्या महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत असलं तरी त्यांना सावध करण्यासाठी या दोन सरकारांचा दाखला पुरेसा आहे. याच कारणामुळे महायुतीतील अनेक नेत्यांना शिवाजी पार्क मैदानाच्या प्रस्तावाला विरोध असल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
