(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics: राज्यात गुन्हेगारीचा ठपका असणाऱ्या आमदारांचा टक्का वाढला; विनयभंग, हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद, पाहा सविस्तर आकडेवारी
Maharashtra Politics: काही आमदारांवरती विनयभंग, त्याचबरोबर हत्येसारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहेत. त्याचबरोबर निवडून आलेल्या काही नेत्यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
Maharashtra Politics: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आले. यातील काही आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, तर काही आमदारांवरती विनयभंग, त्याचबरोबर हत्येसारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहेत. त्याचबरोबर निवडून आलेल्या काही नेत्यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
2009 च्या तुलनेत गंभीर स्वरुपाच्या आमदारांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचं चित्र आहे. 2009 साली निवडून आलेल्यांपैकी 20 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे होते, मात्र 2024 साली ही संख्या 41 टक्क्यांवर पोहोचली आहे. करोडपती आमदारांची संख्या देखील 2024 मध्ये 97 टक्क्यांवर पोहोचली आहे, 2009 साली हिच संख्या 65 टक्के इतकी होती. 288 पैकी 113 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, जवळपास 41 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगारी प्रकरणाची नोंद असलेल्या नवनिर्वाचित आमदारांची संख्या 187 म्हणजे जवळपास 65 टक्के, 2019 साली हिच संख्या 176 होती, म्हणजेच जवळपास 62 टक्के आमदारांवर गुन्हेगारी प्रकरणांची नोंद होती. 2024 मध्ये 3 नवनिर्वाचित आमदारांवर आयपीसी 302 अंतर्गत हत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल होते. 11 आमदारांवर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल होते. 10 आमदारांवर विनयभंगाचा गुन्हा होता. तर त्यातील एक जिंकून आलेल्या आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
महायुतीतील किती आमदारांवर गंभीर गुन्हे
भाजपातील 132 आमदारांपैकी 53 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, म्हणजे जवळपास 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या 57 आमदारांपैकी 27 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे जवळपास 47 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 आमदारांपैकी 12 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे जवळपास 29 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीतील किती आमदारांवर गंभीर गुन्हे
शिवसेना उबाठा 20 आमदारांपैकी 8 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे जवळपास 40 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी 6 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, म्हणजे जवळपास 38 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एनसीपी-एसपीच्या 8 आमदारांपैकी 4 आमदारांवर गंभीर गुन्हे, म्हणजे जवळपास 50 टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. समाजवादी पार्टीच्या 2 आमदारांपैकी 2 आमदारांवर गंभीर गुन्हे, म्हणजेच 100 टक्के आमदांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
2009 साली आमदारांची सरासरी संपत्ती ही 4.07 कोटी होती, तीच संपत्ती आता 2024 साली निवडून आलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती 43.42 कोटींवर गेली आहे. सर्वाधिक संपत्ती असलेल्या आमदारांमध्ये पराग शाह, मंगलप्रभात लोढा आणि प्रशांत ठाकूर यांची नावं आहेत. सर्वात कमी संपत्ती असलेल्या आमदारांमध्ये साजिद खान पठाण, श्याम खोडे आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक डोक्यावर कर्ज असलेल्या आमदारांमध्ये मंगलप्रभात लोढा, प्रताप सरनाईक तर विश्वजीत कदम यांच्या नावाचा समावेश आहे.
आयटीआर डिक्लेअर करताना सर्वाधिक संपत्ती जाहीर कोणी केली :
पराग शाह (3383 कोटी)
रोहित पवार (106 कोटी)
अतुल भोसले (82 कोटी)
2024 मध्ये पुन्हा नव्याने निवडून आलेल्या आमदारांची संख्या 183 आहे
183 आमदार पुन्हा निवडून आले आहेत त्यांची सरासरी संपत्ती?
2024 साली - आमदारांची सरासरी संपत्ती - 56.81 कोटी रुपये
2019 साली - ह्याच आमदारांची सरासरी संपत्ती होती 27.28 कोटी रुपये म्हणजे पुन्हा एकदा आमदार झालेल्यांची 2019 ते 2014 दरम्यान संपत्ती 108 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडून आलेल्या आमदारांपैकी पुरुषांची संख्या 92 टक्के, म्हणजे 264 आमदार तर नवनिर्वाचित आमदारांमध्ये 22 महिलांचा समावेश आहे.