गुन्हे शाखेची कमाल, दरोडा टाकण्याआधीच दरोडेखोरांना केलं गजाआड
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 (Crime Branch 2 ) ला एका ठिकाणी दरोडा पडणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सर्व आरोपींना दरोडा टाकायच्या आधीच अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय.
मुंबई: हिंदी चित्रपटात आपण नेहमीच पाहतो की गुन्हा घडल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी पोहचतात. मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक अनोखी कामगिरी बजावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गुन्हे शाखेने चार आरोपींना दरोडा टाकण्याआधीच गजाआड केलं आहे. तब्बल 80 लाख रुपयांचा दरोडा ही टोळी टाकणार होती. या टोळीवर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
जागतिक पातळीवर तपासाच्या बाबतीत मुंबई पोलिसांचा दुसरा नंबर का लागतो याची प्रचिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 ने दिली आहे. इतर वेळी गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी जातात आणि त्याचा तपास करतात. मात्र या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांना गुन्हा करण्याआधीच पकडलं आणि कोणाची तरी आयुष्यभराची कमाई चोरी होण्याआधीच वाचवली.
'चोरीच्या तपासात दिरंगाई, नीट तपास करा' म्हणत औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांना फटकारले
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 ला त्यांच्या हेरांकडून माहिती मिळाली की विकी ऑटो पार्ट दुकानाच्या समोर, संत रोहिदास उड्डाणपुलाच्या खाली काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं एकत्र येऊन तिथल्या जवळच्या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकणार आहेत. मग त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांना दरोडा टाकण्याच्या आधीच पकडायचं नियोजन केलं. त्यानुसार सापळा रचून त्या टोळीला पकडलं.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक खोटे बंदूक, सूरा, मिरची पावडर, चिकटपट्टी इत्यादी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व वस्तूंचा दरोडा टाकण्यासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेली ही टोळी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे. या टोळीवर मुंबईमधील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आधी सुद्धा या टोळीतील सदस्यांना अटक करण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वीच ते सर्वजण जामीनावर बाहेर आले होते.
आधी करायचे रेकी अन् मग.. बंटी-बबलीचा साथीदारासह कल्याणमध्ये धूमाकूळ
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. राफीअली कुतूबली (30), मोहमद सुहेल मैनुद्दीन अन्सारी (22), नासीरआलम अल्लीमुद्दीन (25) अशी या आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगीरीचे कौतुक सर्वत्र होत असून वरिष्ठांनी सुद्धा कौतुकाची थाप दिली आहे.
पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन जगदाळे, मिलिंद काठे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे, आनंद देशमुख, पोलीस अमलदार हृदयनाथ मिश्रा, राजेंद्र सोनवणे, प्रशांत थीटमे, सचिन कांबळे, सुनील हरड, अमोल साळुंखे, प्रकाश कदम, महिला पोलीस शिपाई पाटील यांच्या पथकाकडून सदर गुन्हा उघडकीस करण्यात आला.