Dombivli Crime : घटनास्थळी आढळलेल्या टोपीवरुन हत्येचा उलगडा, 22 तासात आरोपी गजाआड
Dombivli Crime : 'सुतावरुन स्वर्ग गाठणे' या म्हणीचा प्रत्यय डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांच्या तपासात दिसून आला. घटनास्थळावर सापडलेल्या टोपीवरुन पोलिसांनी अवघ्या 22 तासात खुनाचा उलगडा केला.
कल्याण-डोंबिवली : 'सुतावरुन स्वर्ग गाठणे' या म्हणीचा प्रत्यय डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी केलेल्या तपासात दिसून आला. काहीच पुरावा नसताना घटनास्थळी आढळलेल्या टोपीवरुन पोलिसांनी हत्येचा अवघ्या 22 तासात उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदानात काल (13 जून) दुपारच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या इसमाचा डोक्यावर लाकडी फळीने मारल्याच्या खुणा होत्या. विष्णूनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी आढललेल्या टोपीच्या आधारे तपास सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी या टोपी घातलेल्या इसमाचा शोध घेतला. अवघ्या काही तासात पोलिसांनी हत्या करणाऱ्या अर्जुन मोरे याला बेड्या ठोकल्या. दोघे ही एकमेकांना ओळखत नव्हते. मैदानात दारु पीत असताना झालेल्या वादातून ही घटना घडली. दरम्यान अद्याप मृत इसमाची ओळख पटली नसून त्याची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदानात काल दुपारच्या सुमारास एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत इसम हा फिरस्ता होता, कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्याची हत्या का आणि कुणी केली याचा तपास करत आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलं होतं. मृतदेहाच्या डोक्यावर लाकडी फळीने मारल्याच्या खुणा होत्या. विष्णूनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. दरम्यान घटनास्थळी मिळालेल्या टोपीच्या आधारे विष्णूनगर पोलिसांनी तपास सुरु केला. खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही कॅमरामध्ये टोपी घातलेल्या इसमाचा शोध घेतला. पोलिसांनी अवघ्या काही तासात या टोपी घातलेल्या इसमाला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेही हत्या केलेल्या इसमाचे वर्णन सांगितलं. हे दोघेही एकमेकांना ओळखत नव्हता त्यामुळे त्याला नाव, पत्ता माहित नव्हता.
या प्रकरणात मयत इसम आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. दोघेही मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करत होते. रात्री या मैदानात दारु पिण्यासाठी बसायचे इतकीच त्यांची ओळख होती. त्यामुळे आता या आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. पोलिसांनी पुन्हा परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासलं. खबऱ्यांकडून माहिती घेतली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्या करणाऱ्या अर्जुन मोरे याची ओळख पटवत त्याला डोंबिवलीमधून काही तासातच बेड्या ठोकल्या. अर्जुन मोरे याला पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली होती त्यामुळे तो कोल्हापूरला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.