(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! खिचडीत मीठ जास्त झाल्याने पतीकडून पत्नीची हत्या
Crime News : खिचडीत मीठ जास्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. निलेश घाग असे हत्या करणाऱ्या संशयित पतीचे नाव आहे.
भाईंदर : सासऱ्याला वेळेत चहा, नाश्ता न दिल्याच्या रागातून गोळी झाडून सुनेची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबई जवळच्या भाईंदर येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. खिचडीत मीठ जास्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. निलेश घाग असे हत्या करणाऱ्या संशयित पतीचे नाव आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निलेश आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी बनवली होती. ही खिचडी खारट झाली होती. त्यामुळे रागाच्या भरात निलेश याने पत्नीची कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी निलेश घाग याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, खिचडीमध्ये मीठ जास्त झाल्यामुळेच हत्या केली की, हत्या करण्यास आणखी काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. नवघर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश मसाल यांनी याबाबत माहिती दिली.
दोन दिवसांत दोन घटना
सुनेने न्याहारी दिली नाही या रागातून 76 वर्षीय सासऱ्याने सुनेची परवानाधारक रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना ठाण्यातील राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल घडली आहे. या घटनेनंतर सासरा फरार झाला होता. परंतु, आरोपी सासरा काशिनाथ पाटील आज राबोडी पोलिसांसमोर हजर झाला. सुनेची हत्या करून फरार झालेला काशिनाथ रात्रभर मुंब्रा येथे झोपला होता. ही घटना ताजी असतानाच आज पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या