दुसऱ्या हत्येमुळे उलगडला पहिल्या हत्येचा तपास, अहमदनगरमधील धक्कादायक घटना
नाशिकला जाताना मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून खून केला. मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कारखाना परिसरात गुंजाळ नाक्याजवळ 14 मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून केलेल्या निर्घृण खुनाचा तपास लावण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला आणि त्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकला.. पोलीस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली देत खुनाचे रहस्य उलगडले.
मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे (दोघेही रा. शिरुर कासार, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव (ता. शेवगांव) येथील रहिवासी असून गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याची रवानगी मामाकडे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे केली. यानंतर त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक येथील शितल भामरे या विवाहितेची ओळख झाली. तिला दोन मुले असताना ज्ञानेश्वरशी प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने तिला परत नाशिकला सोडण्यास सांगितले. ज्ञानेश्वरने नाशिकला जाताना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहुरी फॅक्टरी येथे प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून खून केला. मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते. परंतु, तरुणीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तपास थंडावला होता.
दरम्यान आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसर्या मुलीशी लग्न केले आणि पत्नीला दागिने खरेदी केले. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सराफ व्यवसायिक विशाल सुभाष कुलथे याला दागिने घेऊन घरी बोलावून त्याचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला. या हत्येनंतर गावातून हळहळ व्यक्त केली आणि आरोपीला अटक करण्याची मागणी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केली
मृत सोनार विशालला वडिल नव्हते. मात्र 70 वर्षीय वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे नातवाच्या खुनाच्या धक्काने ह्रदविकाराच्या मृत्यू पावले. दरम्यान मयत विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून तब्बल 90 किलोमीटर दूर भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला. मामाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. भीतीपोटी आरोपीचा मामा अजिनाथ गायके (रा. शिरुर कासार) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. म्हणजेच आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने दोन खून केले मात्र उर्वरित दोन मृत्यूस कारणीभूत ठरला हे मात्र खरे...
मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रियसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी शिरूर कासार (जि. बीड) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांनी कोठडीत संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला दिला जाणार असून प्रेयसीच्या खुनाचा तपास राहुरी पोलीस करतील.