(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara : भंडाऱ्यात सहा दरोडेखोर जेरबंद; डॉक्टर पुत्र दरोड्याचा मास्टरमाईंड, जिल्ह्यात खळबळ
Bhandara Crime Updates : साकोलीच्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.
Bhandara Crime Updates : भंडारा जिल्ह्यात एका डॉक्टराच्या मुलाने दुसऱ्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोडा टाकण्याचा प्लॅन केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा प्लॅन फिस्कटला आणि डॉक्टर पुत्रासह सहाजणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये (Bhandara Sakoli News) घडली आहे. साकोलीच्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. पहाटे साकोली तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर अटक केली आहे.
या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद डोंगरवार असं या डॉक्टर पुत्राचं नाव आहे. अरविंदसह सूरज जयस्वाल, मिलिंद गजभिये, रामेश्वर वाढई , कोमल बनकर अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. विशेष म्हणजे अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांचा मुलगा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी फोन द्वारे मिळाली होती. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटार सायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तपासले असता त्यांच्याजवळ लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली.
आरोपींना ताब्यात घेतलं असताना साकोली तालुक्यातील आमगाव येथील डॉ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले. विशेष म्हणजे डॉक्टर परिवारासह बाहेरगावी असून त्यांची आई एकटी घरी होती. मात्र भंडारा पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. आरोपींमध्ये साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या