(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani : परभणीत हाय प्रोफाइल जुगार अड्डयावर छापा, तब्बल 45 जणांवर कारवाई
Parbhani News : परभणीच्या सेलू शहरातील कृष्ण नगर येथे हाय प्रोफाइल जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 45 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Parbhani News Update : परभणीच्या सेलू शहरातील कृष्ण नगर येथे सुरू असलेल्या हाय प्रोफाइल जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून तब्बल 45 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या 45 मध्ये अनेक व्यापारी आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. परभणीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सेलुच्या कृष्ण नगर येथे एका बंद खोलीत तिर्रट नावाचा बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना मिळाली. त्यावरून त्यांनी त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरुन रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल, मोबाईल असा 25 लाख 65 हजार 528 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 45 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विष्णु गणपत बाघ, माणिक विनोद राजुरकर, रफिक शफीक खान, महालिंगी गणुआप्पा कवळे, कलिम खान लाला खान पठाण, संदिप अर्जुनराव अवसरमल, लिंबाजी ज्ञानेश्वर बोंबले, बालाजी अंशीराम झांजे, भागवत वामनराव लहाने अशी गुन्हा दाखल झालेल्या काही संशयितांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेले 45 संशयित हे परभणीसह परतूर, मंठा , बीड, पुणे, लोणार, किनवट आणि जालना येथील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार अड्यावरील ही कारवाई परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी देखील जिल्ह्यात अशी कारवाई झाली आहे. या पूर्वी झालेल्या कारवाईत 39 संशयितांवर कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्यातील सातोना रोडवरील एका मनोरंजन केंद्रावर मागच्या वर्षी पोलिसांनी कारवाई केली होती.
दरम्यान, आजच्या कारवाईत पोलिसांनी 45 जणांना ताब्यात घेतले असून परभणी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या