(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : खून करुन एकही पुरावा मागे सोडला नाही, नखातील सुकलेल्या रक्ताच्या अंशावरुन मारेकऱ्याचा शोध
मुंबईतील साकीनाका परिसरात सोमवारी 22 वर्षीय विवाहितेचा खून झाला. पण एकही पुरावा मागे न सोडल्याने मारेकऱ्याचा शोध घेणं अशक्य होतं. पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला.
मुंबई : गुन्हेगाराने कितीही सराईतपणे किंवा चातुर्याने गुन्हा केला आणि पोलिसांना गुंजारा दिला तरी गुन्हेगार हा पोलिसांच्या तावडीतून काही सुटत नाही. मुंबईच्या साकीनाका परिसरात असाच प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आणि मागे एकही पुरावा सोडला नाही. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेणं अशक्य होतं. पण मुंबई पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन त्याच्या नखांची तपासणी केली तेव्हा त्यात सुकलेल्या रक्ताचे अंश आढळून आले आणि पतीने पत्नीचा केलेला खून उघडकीस आला.
22 वर्षीय रिमा यादव हिचे लग्न मनोज प्रजापती याच्याशी झालं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांनीच त्यांच्यात वाद होऊन दोघेही वेगळे राहू लागले. या दरम्यान तिला काही काम नसल्याने मदत म्हणून रोहित नावाचा 18 वर्षीय तरुण तिला जेवण आणि नाश्ता देत असे. सोमवारी (9 मे) रात्री साडेनऊच्या सुमारास रोहित तिच्यासाठी आणलेलं जेवण घेऊन ती राहत असलेल्या घरी गेला असता रिमा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्याला दिसली. तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आला होता. तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता असं डॅाक्टरांनी घोषित केलं.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास करत असताना पोलिसांनी रिमाच्या पतीला चौकशीकरता बोलावलं. मात्र रिमाची हत्या झाली त्यावेळी आपण तिथे नव्हतो, हे तो वारंवार पोलिसांना सांगत होता. पोलिसांकडेही त्याच्याविरोधात ठोस पुरावे नव्हते. मात्र जेव्हा रिमा ज्या जंगलेश्वर मंदिराच्या मागच्या चाळीत राहत होती, तिथल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, तिचा पती मनोज प्रजापती हा त्या भागातून जाताना एका कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र आपण कामावरुन घरी जात होतो असं त्याने उत्तर दिल्याने पोलीसही चक्रावून गेले. शेवटी पोलिसांनी मनोजची कसून चौकशी केली तेव्हा त्याच्या नखात सुकलेल्या रक्ताचे अंश आढळले. पोलिसांनी मनोजला ताब्यात घेऊन त्याच्या नखातील रक्ताच्या अंशाची तपासणी केली. हे रक्ताचे अंश आणि रिमाचे रक्त एकच असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा पोलिसांनी मनोजला खाक्या दाखवताच त्याने आपणच चारित्र्याचा संशय घेऊन तिची हत्या केल्याचं कबूल केलं. अशाप्रकारे मनोजने रिमाची हत्या करण्यासाठी वापरलेलं हत्यार हस्तगत करुन पाच तासाच्या आत तिच्या खुनाचा उलगडा केला.
या गुन्हयाचा तपास लवकरात लवकर करुन गुन्हा उघडकीस आणल्याने पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, मुंबईच्या परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी, साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद पवार यांनी साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख,पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिनकर राऊत, पोलीस निरीक्षक उमेश दगडे आणि गुन्हे प्रकटीकरण/ निगराणी पथकाचं कौतुक केलं आहे.