Beed Crime: बिहारलाही लाजवेल अशीच परिस्थिती; बीडमध्ये 15 दिवसात तीन हत्या, एकाला कात्रीने मारलं तर दोघांना कोयत्याने कापलं
Beed Murder : नवीन पोलिस अधीक्षकांनी धुरा घेऊन महिने झाले तरी बीडमधील गुंडगिरी काही थांबण्याचं नाव दिसत नाही. गेल्या 15 दिवसात तीन हत्या झाल्यानंतर ते अधोरेखित होतंय.

बीड : सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर तातडीने हालचाली करुन गुंडगिरी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले खरे. पण त्यामध्ये त्यांना काही यश आले नसल्याचीच परिस्थिती सध्या आहे. गेल्या 15 दिवसात बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची हत्या करण्यात आली आहे. त्यापैकी एकाला कात्रीने वार करुन तर दोघांना कोयत्याने वार करुन संपवलं. यामध्ये भाजप बूथ विस्तारकाचाही समावेश आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि गँगची दहशत संपवण्यासाठी राज्य सरकारने नवनीत कावत यांना पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील गुंडगिरीला वचक बसेल अशी चर्चा असतानाच तिथल्या हत्या आणि गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेत नाही.
कैचीने डोक्यात वार, स्वप्निल देशमुखला संपवलं
- धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याची जुन्या वादातून हत्या झाली. त्या गावातील संतोष देशमुख नावाच्या व्यक्तीने आणि त्याची पत्नी सोनाली देशमुखने त्यांच्या अन्य साथीदारांसह ही हत्या केली.
- यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे स्वतः सिरसाळा पोलिस ठाण्यात हजर झाले होते. ही घटना 30 मार्च रोजी घडली.
- या हत्येसाठी कापूस उपटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कैचीने डोक्यात वार करत आणि डोके दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले होते.
- संतोष देशमुख याचा भाऊ अविनाश देशमुख याने स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून 2023 साली आत्महत्या केली होती.
- याच आत्महत्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्निल देशमुख संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दबाव आणत होता.
- या प्रकरणी शिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
अंबाजोगाईत कोयत्याने वार करुन एकाला संपवले
- अंबाजोगाईतील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली होती.
- यामध्ये करडे याच्या गळ्यावर, डोक्यात,पाठीवर वार करण्यात आले होते यात करडे गंभीर जखमी झाला होता.
- जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
- यातील तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे अंबाजोगाई पोलिसांकडून सांगण्यात आले.
भाजप बूथ विस्तारकाची हत्या
- माजलगाव येथील बाजार रस्त्यावर बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 30 वर्षे) हे दुपारी 2 वाजण्याचा सुमारास उभे असताना आरोपी नारायण शंकर फपाळ याने आगेवर कोयत्याने वार केला.
- यामुळे आगे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 15 एप्रिल रोजी घडली.
- घटनेनंतर आरोपी फपाळ स्वतः माजलगाव येथील पोलीस ठाण्यात कोयत्यासह हजर झाला. यावेळी त्याने या घटनेबाबतची पोलिसांना कबुली दिल्याची माहिती आहे.
- या घटनेतील मयत बाबासाहेब प्रभाकर आगे हा भाजपचा बूथ विस्तारक म्हणून काम पाहत होते. तसेच ते भाजपच्या तालुका सरचिटणीस या पदावर असल्याची माहिती भेटली आहे.
ही बातमी वाचा:
























