Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने तपास सुरू केला आहे. पण या तपासातून काही निष्पन्न होणार नाही असं सांगत खासदार बजरंग सोनवणे यांनी टीका केली आहे.
बीड : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काही फरक पडणार नाही, असं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. मागील सरकारमध्ये धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रिपद दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली, असा आरोपही त्यांनी केला. बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे आश्वासन पोलिसांकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या प्रकरणात वेगवेगळी वक्तव्यं येतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आरोपींना शिक्षा करू. पण तसं काहीही होताना दिसत नाही. या प्रकरणाचा तपास पुढे जात नाही. मी पहिल्या दिवसांपासून सीबीआय तपासाची मागणी करतोय.
संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर या प्रकरणातील मास्टरमाईंडला शोधलं पाहिजे. खंडणी प्रकरणात ज्यांचे नाव आलं आहे त्यांचे या हत्याप्रकरणाशी काही संबंध आहे का हे तपासायला हवं अशी मागमी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुवव्यस्था पूर्वपदावर यावी. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अद्याप तीन आरोपी फरारी आहेत. त्यांना पकडण्यात पोलिस दिरंगाई का करतात असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं
या आधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. त्यामुळे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर अजितदादांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी सोनवणे यांनी केली.
विष्णू चाटे यांनी समर्पण केलं की अटक केली?
सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात विष्णू चाटेनी आत्मसमर्पण केले. त्यांनी सरेंडर केले की त्यांना अटक झाली याची माहिती पोलिसांनी द्यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड कोण आहे ,त्याला कधी शोधून काढणार? हत्येला आज 18 दिवस झालेॉ, मग तीन आरोपी अजूनही कसे फरार आहेत असा प्रश्नही सोनवणे यांनी विचारला.
शनिवारी मूक मोर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण होत आहेत. देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपींना अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये आले असून त्यांनी देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर आता सीआयडी ॲक्शन मोड वर काम करत असताना पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा: