Beed Morcha: संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये उद्या विराट मोर्चा, 50 गावांमधील लोक जमणार; शहरात जागोजागी लागले 'ते' बॅनर्स
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेविरोधात रैनापुरात आज आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. तर उद्या (28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील (Beed Crime) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून जवळ जवळ सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात उद्या (28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय. उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.
रैनापुरात आज आक्रोश मोर्चा, 50 पेक्षा जास्त गावातून लोक येणार
मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील दोषी लोकांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. इत्यादि मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रैनापुर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या परिवारातील अनेक सदस्यया मोर्चात सहभागी होणार आहेत. रैनापुर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय अशा या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व बंदुकीचे लायसन्स तातडीने रद्द करा- सचिन खरात
बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा विचित्रपणे बेदम मारहाण करून खून करण्यात आला, त्यामुळे सध्या बीड जिल्हा चर्चेत आहे. परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये 1222 हे बंदुकीचे परवानाधारक आहेत. जर इतर जिल्हे पाहिले तर बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक आहेत, त्यामुळे तत्काळ परवानाधारकांची पूर्णतपासणी करण्यात यावी आणि सध्या तातडीने सर्व बंदुकीची लायसन रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात पक्ष राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री यांना करत असल्याचे सचिन खरात म्हणाले.
देशमुखांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी मारेकर्याला फाशी द्या - बजरंग सोनवणे
तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देवू नये. संतोष देशमुख सारख्या सोज्वळ मुलाच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्या मारेकर्याला फाशीची शिक्षा द्या, हीच माझ्यासह, माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजित दादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजित दादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही मागणी केली आहे.
हे ही वाचा