अंबानींच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार, ट्विट करणारा इंजिनिअर ताब्यात; पोलिसांनी गुजरातमधून उचललं
अनंत व राधिका यांचा लग्नसोहळा 4 दिवस विविध कार्यक्रमांनी चर्चेत राहिला. त्यामध्ये, हळदी,वरात, लग्नाचा दिवस आणि आशीर्वाद रिसेप्शन सोहळ्याचा समावेश होता
मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अंबानी (Anant Ambani) परिवारातील अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा (Marriage) मोठ्या धुमधडाक्यात आणि व्हीव्हीआयपींच्या मेळ्यात संपन्न झाला. 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांनी सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेत लग्नगाठ बांधली. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवत नवदामपत्यास आशीर्वाद दिले. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendrra Modi), बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि सिनेतारकांचीही हजेरी होती. देशातील बडे उद्योगपती आणि क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूही उपस्थित होते. त्यामुळे, या सोहळ्याकडे जेवढे आवडीने पाहिले जात होते, तितकेच या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही तैनात होती. त्यामुळे, या सोहळ्यासंदर्भातील प्रत्येक गोष्टींवर पोलिसांची करडी नजर होती. त्यावरुन, पोलिसांनी गुजरातच्या वडोदरा येथून एकास अटक केली आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयातील धमकीचे ट्विट या युवकाने केले होते.
अनंत व राधिका यांचा लग्नसोहळा 4 दिवस विविध कार्यक्रमांनी चर्चेत राहिला. त्यामध्ये, हळदी,वरात, लग्नाचा दिवस आणि आशीर्वाद रिसेप्शन सोहळ्याचा समावेश होता. 12 जुलै रोही झालेल्या लग्नसोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळ्यादिनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहून अनंत व राधिका यांना आशीर्वाद दिले. त्यांच्यासह विविध हिंदू पीठांचे धर्मगुरुव व शंकराचार्य यांनीही उपस्थित राहून अंबानी कुटुंबीयांस आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळेच, साहजिकच येथील लग्नसोहळ्याच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच, लग्नसोहळ्यासंदर्भातील प्रत्येक गोष्टींवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. त्यातूनच, अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा धमकीचे ट्विट करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयाचे ट्विट एका 32 वर्षीय इंजिनिअर तरुणाने केले होते. मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून या युवकास अटक केली असून अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विरल शहा असे आहे. आरोपी विरल हा 32 वर्षांचा असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. अंबानींच्या लग्नसोहळ्यात सगळे व्हीआयपी एकाच ठिकाणी असून बाँबस्फोट होणार, असे ट्विट आरोपी शहा याने केले होते. या ट्विटनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या, आणि संबंधितावर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या मागावरही होत्या. अखेर गुजरातच्या वडोदरामधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
निमंत्रण नसलेल्या दोघांची लग्नसोहळ्याला उपस्थिती
दरम्यान, अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी निमंत्रण नसलेल्या दोघांनी लग्नसोहळ्याच्या ठिकाणी हजेरी लावली होती. या दोन बिन बुलाये मेहमानांसही पोलिसांनी अटक केली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले होते. विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचं नाव व्यंकटेश नरसैया अल्लुरी हा 26 वर्षांचा यूट्यूबर आहे आणि दुसरा व्यक्ती लुकमान मोहम्मद शफी शेख हा 28 वर्षांचा असून तो स्वत:ला व्यापारी असल्याचं सांगत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.