Ambernath Crime: अंबरनाथमध्ये पाव विक्रीवरून विक्रेत्याचा बेकरी चालकावर प्राणघातक हल्ला, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
Ambernath Crime : अंबरनाथ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी भूषण हळदणकर याच्यासह एकूण चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
![Ambernath Crime: अंबरनाथमध्ये पाव विक्रीवरून विक्रेत्याचा बेकरी चालकावर प्राणघातक हल्ला, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या Ambernath Crime Why are you selling bread in my area Assault on bakery driver Ambernath Crime: अंबरनाथमध्ये पाव विक्रीवरून विक्रेत्याचा बेकरी चालकावर प्राणघातक हल्ला, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/c094843c11b1fb4d572c71007bca80dd1663947539334169_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) पाव विक्रीच्या कारणावरून झालेल्या वादातून विक्रेत्याने बेकरी चालकासह (Bakery) त्याच्या कामगारांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथच्या चिखलोली गाव भागात सामीद खान याची कामरान बेकरी आहे. या बेकरीतून तो अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पावाची विक्री करतो. मात्र बदलापूर शहरात इतर बेकरीतून पाव घेऊन विक्री करणाऱ्या भूषण हळदणकर याला सामीद याच्याबद्दल व्यावसायिक राग होता. याच रागातून त्यानं 14 ऑक्टोबर रोजी तीन वेळा फोनवरून सामीद याला शिवीगाळ केली. तसंच दोन वेळा प्रत्यक्ष भेटून त्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली. यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास तो काही गुंडांना घेऊन थेट सामीद याच्या बेकरीवर पोहोचला. शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला.
सामीद याच्यासह त्याचे भाऊ कामिल खान, खालिद खान, कामगार मोहम्मद युसूफ शहा, उदय नारायण चौधरी यांच्यावर भूषण आणि त्याच्यासह आलेल्या गुंडांनी तलवारी, चॉपर आणि इतर हत्यारांनी हल्ला केला. यात हे सगळेच गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी भूषण हळदणकर याच्यासह एकूण चार जणांना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शहा आणि उपनिरीक्षक शेख हे या प्रकरणाचा तपास करत आहे.
उल्हासनगरात स्थानिक गावगुंडाचा दुकानात धिंगाणा
उल्हासनगरमध्ये गावगुंडाच्या धिंगाण्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय. एका गावगुंडाने दुकानाबाहेर घातलेला धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील धीरा चौकात रोशनी टूर्स आणि किराणा हे दुकान आहे. या दुकानात रविवारी रात्री अवी सिंग लबाना हा स्थानिक गावगुंड मद्यधुंद अवस्थेत आला. त्यानं तिथं येताच ग्राहकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत तिथून हाकलून दिलं. त्यानंतर तो थेट दुकानात घुसला आणि दुकानदार रितेश जैस्वाल याला शिवीगाळ करत त्याच्याकडून एक सोड्याची बाटली फुकट घेऊन गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी दुकानदार रितेश जैस्वाल याच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा गावगुंडांना पोलिसांनी वेळीच अद्दल घडवण्याची गरज यानंतर व्यक्त होतेय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)