Nagpur Crime Diary : मैत्रिणींना घरी बोलावून दोघांकडूनही अत्याचार, फेसबुक फ्रेन्डने केला घात
नागपूरच्या तरुणाने फेसबुकवरुन अमरावतीच्या तरुणीसोबत मैत्री करुन तिला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तर कळमना आणि वाडी परिसरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून पोलिस तपास सुरु आहे.
नागपूरः शहरातील वाडी आणि एमआयडीसी परिसरात दोन आरोपींनी मैत्रिणींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. वाडीच्या विठ्ठलवाडीत किरायाच्या घरात राहणारा आरोपी संकेत संजय चन्ने (वय 31, रा. चंद्रपूर) हिंगण्याच्या एका कंपनीत काम करतो. कंपनीत कार्यरत 30 वर्षांची युवती त्याची मैत्रीण होती. संकेतने 13 मे 2020 रोजी तिला आपल्या खोलीवर भेटण्यासाठी बोलावले. परंतु खोलीवर आल्यानंतर संकेतने तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिला पाजले. ती बेशुद्ध झाल्यानंतर संकेतने तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर मैत्रिणीचे त्याच्याशी भांडण झाले. परंतु संकेतने तिला लग्न करणार असल्याची बतावणी केल्यामुळे ती गप्प बसली. त्यानंतर त्याने जून 2022 पर्यंत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे युवतीने वाडी ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.
अमरावतीच्या तरुणीला घरी घेऊन गेला
MIDC: दुसऱ्या घटनेत एमआयडीसीच्या पारधीनगरात घडली. परवेश विनोद कोरपे (वय 28) याची 13 जून 2021 रोजी फेसबुकवर अमरावतीच्या 26 वर्षाच्या युवतीशी मैत्री झाली. परवेशने युवतीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला फोन करणे सुरू केले. त्यानंतर, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 9 जुलै 2022 रोजी परवेशने युवतीला नागपूर येथील आपल्या घरी बोलावून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
Nagpur: कळमना आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 दरम्यान 55 वर्षीय फिर्यादी यांची 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी कामावर जाते असे सांगून घरून निघून गेली. ती परत न आल्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच आढळली नाही. दुसऱ्या घटनेत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 49 वर्षांचे फिर्यादीची 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी शाळेत गेली असता घरी परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच आढळली नाही. दोन्ही प्रकरणी कळमना आणि जरीपटका पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात गुंड राहुल सूर्यवंशी तडीपार
Ambazari: नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड राहुल छोटू सूर्यवंशी (वय 31, रा. पांढराबोडी) यास दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे. राहुलविरुद्ध विनयभंग, दुखापत करणे, घरफोडी, घातक शस्त्र बाळगणे, जबरी चोरी असे एकूण 20 गुन्हे दाखल होते.