Zee Sony Merger : झी-सोनी नेटवर्कच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, NCLT कडून मंजुरी; शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले
NCLT Approves Zee Sony Merger : NCLT नं झी-सोनी नेटवर्कच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. या नंतर झी इंटरटेन्मेंटच्या शेअर्सची घोडदौड सुरु झाली आहे.
Zee Sony Merger : मनोरंजन जगतातील कंपन्या झी-सोनी नेटवर्कच्या विलीनीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) झी-सोनी नेटवर्कच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. यानंतर झी इंटरटेनमेंटच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या झी इंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (ZEEL) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPN) या कंपन्याच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. NCLT ने गुरुवारी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
झी-सोनी नेटवर्कच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा
10 जुलै रोजी एच.व्ही. सुब्बा आणि मधु सिन्हा यांच्या खंडपीठाने विलीनीकरणाच्या बाबतील आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आता विलीनीकरणाच्या बाबतील महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर झी इंटरटेन्मेंटच्या शेअर्सची घोडदौड सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात झीच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीचे शेअर्सं 281.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
NCLT कडून विलीनीकरणाला मंजुरी
जुलै महिन्यात NCLT ने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. झी इंटरटेन्मेंट आणि सोनी इंटरटेन्मेंट यांनी डिसेंबर 2021 मध्ये विलीनीकरणासाठीच्या करारावर सहमती दर्शवली होती. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंड आणि इतर रेग्युलेटर्स-सिक्युरिटी बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया (SEBI) आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्यांनी करारासाठी ष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) मंजुरी मागितली होती.
शेअर्स 16 टक्क्यांनी वाढले
या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर झीचा शेअर 16 टक्क्यांहून जास्त म्हणजेच 39.20 रुपयांनी 281.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये जवळपास 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 28.90 टक्के आणि गेल्या 1 वर्षात 13.47 टक्के परतावा दिला असून आणि आतापर्यंत 2023 मध्ये, स्टॉक सुमारे 15.78 टक्क्यांनी वाढला आहे.
डिसेंबर 2021 मध्ये करारावर स्वाक्षरी
झी (ZEEL - Zee Entertainment Enterprises Ltd) आणि Sony (SPNI - Sony Pictures Networks India Private Limited) इंटरटेंमेंटच्या विलिनीकरण करारावर डिसेंबर 2021 मध्ये स्वाक्षरी झाली आहे. झी आणि सोनी या कंपन्यांनी ZEEL चे SPNI मध्ये विलिनीकरण करण्यासाठी आणि त्यांचे नेटवर्क, डिजिटल मालमत्ता, उत्पादन ऑपरेशन्स आणि प्रोग्राम एकत्र करण्यासाठी निश्चित करारांवर स्वाक्षरी केली आहे.
काय आहे झी आणि सोनी कंपनीमधील करार?
या करारामध्ये विलिनीकरणानंतर, सोनी इंटरटेंमेंटकडे शेअरचा 50.86 टक्के हिस्सा असेल तर, झीकडे 45.15 टक्के हिस्सा असेल. एस्सेलचा (Essel Group) समूहाचा हिस्सा 3.99 टक्के असेल. बाकी पब्लिक शेअर होल्डर्सचा हिस्सा 45.15 टक्के असेल. विलिनीकरणानंतर पुनीत गोयंका हेच व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कायम राहतील.