बँकेत आरडी करताय? 'या' दोन गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर होऊ शकतो मोठा तोटा!
आरडी हा गुंतवणुकीसाठी सर्वाधिक सुरक्षित पर्यायांपैकी एक मनला जातो. विशेष म्हणजे आरडी करण्यासाठी बँकेत खाते चालू करणे फार सोपे आहे.
मुंबई : जेव्हा गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा हमखास एफडी हा पर्याय स्वीकारला जातो. एफडीमध्ये सर्व रक्कम एकगठ्ठा गुंतवावी लागतो. मात्र काही लोक असे असतात ज्यांना प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करायची असते. अशा लोकांसाठी रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) म्हणजेच आरडी हा पर्याय सर्वोत्तम ठरतो. आरडी हा पर्याय गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वांत सुरक्षित समजला जातो. तुम्ही आरडीमध्ये जेवढे पैसे जमा कराल, ते सर्व सुरक्षित राहतात. विशेष म्हणजे या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगले रिटर्न्सही मिळतात.
आरडीची विशेषता काय?
आरडीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हे फार सोपे आहे. त्यासाठी बँकेत कोणीही खाते खोलू शकतो. कोणीही पैसे जमा करू शकतो आणि मॅच्यूरिटी झाल्यानंतर हे पैसे मिळालेल्या व्याजासह काढता येतात. आरडी हे बचतीचे असे साधन आहे, ज्याच्या माध्यमातून चांगले रिटर्न्स मिळवता येतात. तुम्ही आरडीत पैसे जसे-जसे गुंतवत जाता. तसे तसे तुमच्या आरडी खात्यातील रक्कम वाढत जाते. गरज भासल्यास तुम्हाला आरडीवर कर्जदेखील मिळते. आजकाल तर आरडी खात्यात तुम्ही ऑनलाईन पैसेदेखील गुंतवू शकता. दरम्यान, आरडीच्या माध्यमातून पैसे गुंतवणे सोपे असले तरी त्यासाठीच्या अटी आणि शर्ती समजून घेणे आवश्यक आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
आरडी खाते खोलताना काही बाबींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आरडी खात्यात जमा करावयाची तारीख निश्चित करताना विचार करावा. आरडीचा कालावधीही काळजीपूर्वक आणि विचार करूनच निवडावा. कारण तुम्ही तुमच्या आरडीचा कालवधी आणि पैसे जमा करण्याची तारीख एकदा ठरवली यात नंतर कोणताही बदल करता येत नाही. तुम्हाला यात काही बदल करायचा असेल तर तुमचे आरडी खाते बंद करणे हा एकमेव पर्याय असतो. मुदतीच्या अगोदर आरडी खाते बंद करून नवे खाते चालू करावे लागेल. मुदतीआधी खाते बंद केल्यामुळे तुम्हाला दंडदेखील भरावा लागेल. त्यामुळे आरटी खातं खोलताना त्याचा कालावधी आणि पैसे जमा करण्याची तारीख निश्चित करताना विचार करा. या दोन गोष्टी विचारपूर्वक ठरवा.
तुम्ही आरडी खात्यात नियमितपणे पैसे जमा करू शकले नाही किंवा काही महिन्यांची आरडी रक्कम भरायची राहून गेल्यास बँक तुमचे खाते बंद करू शकते. हेच खाते तुम्हाला पुन्हा चालू करायचे असेल तर दंड भरावा लागू शकतो. मुदतीपूर्वी खाते बंद झाल्यास तुम्हाला व्याजाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम कमी होऊ शकते.
घरी बसून करू शकता गुंतवणूक
आरडी खाते बंद होऊ नये म्हणून तुम्ही एकाच वेळी आगामी दोन ते तीन महिन्यांचा हफ्ता एकदाच भरू शकता. मात्र एकापेक्षा अधिक हफ्ते एकदाच भरल्यावर तुम्हाला अतिरिक्त व्याजाचा फायदा मिळत नाही. त्या-त्या महिन्यात जमा करावयाच्या रकमेवरच तुम्हाला व्याज मिळेल. आजकाल आरडीची रक्कम तुम्ही ऑनलाईन भरू शकता. वेगवेगळ्या बँकांनी तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अॅपच्या मदतीने आता आरडी भरता येते. बँकांनी आरडीत पैसे भरण्यासाठी ऑटो डेबिटचाही पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
हेही वाचा :
आगामी आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'या' दिग्गज कंपन्यांचे शेअर्स होणार एक्स डिव्हिडेंड!
लग्नाचा असाही फायदा, वाचू शकतो तुमचा कर; जाणून घ्या नेमकं कसं?
बड्या सरकारी कंपनीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता, आपल्याला पुन्हा एकदा HMT चे घड्याळ दिसणार?