बड्या सरकारी कंपनीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता, आपल्याला पुन्हा एकदा HMT चे घड्याळ दिसणार?
एचएमटी कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यावर विचार केला जात आहे. त्यासाठी अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारास्वामी यांनी अधिकाऱ्यांकडून कंपनीबाबतची माहिती घेतली आहे.
नवी दिल्ली : भारतात जोपर्यंत क्वॉर्ट्झ घड्या प्रसिद्ध नव्हत्या तोपर्यंत प्रत्येकाच्या मनगटावर चावी असणाऱ्या घड्याच दिसायच्या. या घड्या तयार करण्याचे काम हिंदुस्तान मशीन्स टूल्स अर्थात एचएमटी ही सरकारी कंपनी करायची. घड्यांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याचं काम याच कंपनीने केलं. आता याच कंपनीच्या बाबतीत केंद्र सरकार मोठे प्लॅनिंग आखत आहे.
एचएमटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
एचएमटी ही कंपनी अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणारी शासकीय कंपनी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात एनडीएची सत्ता आली आणि हे मंत्रालय आता जनता दल सेक्यूलरचे नेते एच डी कुमारास्वामी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांनी नुकतेच एचएमटी या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
एचएमटीच्या पुनरुज्जीवनाची आखली जातेय योजना
अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारास्वामी यांनी एचएमटी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या कंपनीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात चर्चा केली आहे. या कंपनीतर्फे तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा खप कसा वाढेल, यावरही या बैठकीत चर्चा झाली आहे. कुमारास्वामी यांनी या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश कोहली यांना कंपनीच्या पुनरुज्जीवनाबाबत एका प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी कोणती मदत हवी आहे, तेही सांगावे असेही कुमारास्वामी यांनी या अधिकाऱ्याला सांगितल्याचे म्हटले जात आहे.
कंपनीची स्थिती घेतली जाणून
अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एच डी कुमारास्वामी यांनी एचएमटी कंपनीचा व्यवसाय, निव्वळ नफा, सध्याची कंपनीची स्थिती, उत्पादन, केल्या जाणाऱ्या कामाची स्थिती काय? याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. तसेच याबाबतची सखोल माहितीदेखील अधिकाऱ्यांना मागवण्यात आली आहे.
एचएमटीची घडी पुन्हा येणार का?
या कंपनीच्या पुनरुज्जीवनावर काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भरत या मोहिमेप्रमाणेच हे एक काम आहे, असे कुमारास्वामी यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा एचएमटी कंपनीच्या घड्या बाजारात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तशी आशादेखील व्यक्त केली जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही ठोस योजना नाही. एचएमटी कंपनी सध्या संरक्षण विभाग आणि अंतराळ विभागासाठी अनेक महत्त्वाच्या मशीन आणि उपकरणे तयार करते. या कंपनीकडे देशात अनेक ठिकाणी मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स आहेत. मात्र या कंपनीपुढे अनेक आव्हाने आहेत. आर्थिक संकट, कायदेशीर पेच, आर्थिक तोटा अशा अनेक संकटांना ही कंपनी तोंड देत आहे.
हेही वाचा :
लग्नाचा असाही फायदा, वाचू शकतो तुमचा कर; जाणून घ्या नेमकं कसं?