(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Toll Collection : रेकॉर्डब्रेक टोल वसुली, जानेवारीपर्यंत 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडला, 62 हजार कोटी जमा होण्याची शक्यता
Toll Collection : या आर्थिक वर्षांत टोल रस्त्यांचा विस्तार आणि FASTag वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याने देशातील टोल संकलनात वाढ झाल्याचं दिसून आलं.
नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुलीत (Toll Collection) विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आलं. या आर्थिक वर्षाच्या जानेवारी अखेरीस राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली 50,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत टोल वसुली 62,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहॆ. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत सरासरी मासिक टोलवसुली 5,328.9 कोटी रुपये होती. टोल रस्त्यांचा विस्तार आणि FASTag वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ हे या संकलनात वाढ होण्याचे कारण आहे.
केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत देशातील टोलवसुली 53,289.41 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ज्यामुळे टोल आकारणीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि नवीन रस्त्यांची भर पडली आहे.
टोलवसुली मोठ्या प्रमाणात वाढली
सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधीत सरासरी मासिक टोलवसुली 5,328.9 कोटी रुपये होती. यावरून असे दिसून येते की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये टोल वसुली 62,000 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. या आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत देशातील टोल रस्त्यांची एकूण लांबी 25,996 किमीवरून 45,528 किमीपर्यंत वाढली आहॆ. ही वाढ तब्बल 75 टक्के इतकी आहे.
जीपीएस आधारित टोल वसुली सुरू होणार
सरकार लवकरच जीपीएस आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करणार आहे. त्यामुळे टोलवसुलीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. जीपीएस आधारित टोल वसुली प्रणालीमुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांऐवजी टोल रस्त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल. मात्र यामुळे टोलनाक्यांवरील वाहतूक वाढून सरकारसमोर नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहॆ.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस देशात 79.8 दशलक्ष पेक्षा जास्त फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग शुल्क प्लाझावर FASTag द्वारे दररोज सरासरी टोल संकलन सुमारे 147.31 कोटी रुपये आहे.
मुंबईतील कोणत्या एन्ट्री पॉईंटवर टोल?
मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो.
- छोटी वाहने – 45 रुपये
- मध्यम अवजड वाहने – 75रुपये
- ट्रक आणि बसेस – 150 रुपये
- अवजड वाहने – 190 रुपये
ही बातमी वाचा :