(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sensex Closing Bell : इस्रायल-हमासच्या युद्धात गुंतवणूकदार होरपळले; एकाच दिवसात 2.40 लाख कोटी बुडाले
Share Market Closing Bell : इस्रायल हमासच्या युद्धाच्या परिणामी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली.
मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा बुधवारचा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला आहे. सकाळी बाजार तेजीसह सुरू झाला. मात्र इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर भारतीय बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला.
आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 551 अंकांच्या घसरणीसह 65,877 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 140 अंकांच्या घसरणीसह 19,671 अंकांवर बंद झाला.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम बाजाराच्या वातावरणावर झाला. सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बँक निफ्टी निर्देशांक 520 अंकांच्या घसरणीसह 43,888 अंकांवर बंद झाला. याशिवाय आयटी, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमधील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर हेल्थकेअर, फार्मा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
आजच्या व्यवहारात बजाज फायनान्सच्या शेअर दरात 2.72 टक्के, बजाज फिनसर्वमध्ये 2.02 टक्के, एनटीपीसीमध्ये 1.63 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 1.53 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांना फटका
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 18 ऑक्टोबर रोजी 321.43 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. आधीच्या दिवशी मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी हे बाजार भांडवल 323.82 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.