Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत; रुपया 78.95 प्रति डॉलरवर
Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत आज रुपया मजबूत झाला. मागील काही दिवसांपासून डॉलर वधारला होता.
Rupee Vs Dollar: आज डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला आहे. मागील एक महिन्यात पहिल्यांदा रुपयाचा दर 79 हून खाली आला आहे. आज रुपयात आठ पैशांची तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया आठ पैशांनी वधारत 78.95 वर खुला झाला आहे. सोमवारी रुपया प्रति डॉलर 79.03 रुपयांवर बंद झाला होता. डॉलरमध्ये झालेली घसरण हे चांगले संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
रुपया का वधारला?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे डॉलर घसरला असल्याचे म्हटले जात आहे. बाजारातील विश्लेषकांनी सांगितले की, घरगुती शेअर बाजारात असलेली तेजी, गुंतवणूकदारांचा पुन्हा सुरू झालेला ओढा आदी कारणांमुळे रुपया वधारला. त्याशिवाय
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंदीची शक्यता नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याशिवाय, महागाईदेखील आटोक्यात राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रुपया आणखी वधारला.
सोमवारी झालेल्या व्यवहाराच्या दरम्यान, रुपयाने प्रति डॉलर 79 रुपये प्रति डॉलर इतका स्तर गाठला होता. तर, 79.22 रुपये प्रति डॉलर इतका नीचांकी दर गाठला होता.
तज्ज्ञ काय म्हणतात?
शेअरखान बीएनपी पारिबाचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची असलेली तयारी, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट, त्याशिवाय भारताचा उत्पादक पीएमआय जुलै महिन्यात 56.4 झाला. जून महिन्यात हाच आकडा 53.9 इतका होता. या कारणांनी ही रुपया वधारला.
डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत कशी ठरते?
कोणत्या देशाच्या चलनाचे मूल्य हे अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांत, मागणी आणि पुरवठा यावर आधारीत असते. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ज्या चलनाला अधिक मागणी असते त्याची किंमत अधिक असते. ज्या चलनाची मागणी कमी असते त्याची किंमतदेखील कमी असते.
चलन मूल्य ठरवण्यासाठी Pegged Exchange Rate ही देखील एक पद्धत असते. Pegged Exchange Rate म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज दर असतो. यामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपल्या चलनाचे मूल्य निश्चित करतो. व्यापार वाढवण्यासाठी आणि महागाई वाढवण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.