Rupee Vs Dollar : रुपयाने गाठला ऐतिहासिक नीचांक; कसा ठरतो चलन विनिमय दर, जाणून घ्या
Rupee Vs Dollar : रुपयाने डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांहून अधिक दर गाठला आहे. डॉलर अधिक मजबूत होत असून रुपया कमकुवत होत आहे.
Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ऐतिहासिक नीचांकी दर गाठला. एका डॉलरची किंमत 80 रुपयांहून अधिक झाली. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर घसरत्या रुपयांच्या मुद्यावरून टीका केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची विरोधात असताना डॉलर-रुपयांच्या किंमतीवर केलेली वक्तव्ये, भाषण व्हायरल केली जात आहेत. डॉलर आणि रुपयाचा दर ठरतो कसा, याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण झाले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत कशी ठरते?
कोणत्या देशाच्या चलनाचे मूल्य हे अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांत, मागणी आणि पुरवठा यावर आधारीत असते. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये ज्या चलनाला अधिक मागणी असते त्याची किंमत अधिक असते. ज्या चलनाची मागणी कमी असते त्याची किंमतदेखील कमी असते.
चलन मूल्य ठरवण्यासाठी Pegged Exchange Rate ही देखील एक पद्धत असते. Pegged Exchange Rate म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज दर असतो. यामध्ये एक देश दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपल्या चलनाचे मूल्य निश्चित करतो. व्यापार वाढवण्यासाठी आणि महागाई वाढवण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.
नेपाळने भारतासोबत Pegged Exchange Rate संकल्पना स्वीकारली आहे. त्यामुळे भारतीय एका रुपयाची किंमत नेपाळमध्ये 1.6 नेपाळी रुपये इतकी असते. नेपाळशिवाय मध्य आशियातील काही देशांनी देखील ही संकल्पना स्वीकारली आहे.
चलनाची मागणी कमी, जास्त कशी होते?
डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे. जगभरातील बहुतांशी व्यापार डॉलरमध्ये होतो. आपण परदेशातून एखादी वस्तू मागवतो, आयात करतो, त्या वस्तूचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात. त्याशिवाय आपण निर्यात करतो तेव्हा त्याची रक्कम देखील डॉलरमध्ये मिळते. सध्याच्या स्थितीत आपण आयात अधिक करत असून निर्यात त्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळेच आपण इतर देशांना डॉलर अधिक प्रमाणात देत आहोत आणि आपल्याला कमी डॉलर मिळत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास भारतात जगातून मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे. तर कमी प्रमाणात विक्री करत आहे.
डॉलरची किंमत रुपयांच्या तुलनेत का वाढत आहे?
डॉलरची किंमत फक्त रुपयाच्या तुलनेत वाढत नसून इतर चलनांवरही त्याचा परिणाम होत आहे. युरोपीयन युनियनचे चलन युरोची किंमत डॉलरच्या तुलनेत मागील 20 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे. काही दिवसांपूर्वी एक युरोची किंमत ही एक डॉलर इतकी झाली होती. वर्ष 2009 च्या आसपास हा विनिमय दर 1.5 डॉलर इतका होता. यंदाच्या वर्षाच्या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत युरोची किंमत 11 टक्के, येनची किंमत 19 टक्के आणि पौंडची किमत 13 टक्क्यांनी घसरली आहे. तर भारतीय रुपयांच्या दराशी तुलना करता सहा टक्क्यांची घसरण झाली आहे.
डॉलर का वधारला?
रशिया-युक्रेन युद्धामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली. मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र बिघडले. गुंतवणूकदारांनी भीतीमुळे बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतली आणि इतर सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केली. अमेरिकन गुंतवणूकदारांनी भारतासह युरोप आणि इतर देशांतूनही माघार घेतली आहे.
अमेरिकेत महागाईने मागील 41 वर्षातील उच्चांक गाठला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याज दर वाढवला जात आहे. अमेरिकेत व्याज दरात आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्याज दर वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा अमेरिकेत गुंतवणूक करत आहे.
फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय ?
फॉरेन एक्सचेंज मार्केट हे आंतरराष्ट्रीय बाजार आहे. या ठिकाणी जगभरातील चलनांची खरेदी-विक्री केली जाते. फॉरेन एक्सचेंज मार्केट हे विकेंद्रीत असते. या ठिकाणी एका निश्चित दरात दोन चलनांमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. दोन्ही चलन ज्या दरावर खरेदी-विक्री केली जाते, त्याला एक्सचेंज दर (विनिमय दर) म्हणतात. या दरात मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार चढ-उतार होत असतो.