Repo Rate : RBI सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवण्याची शक्यता,गृहकर्जदारांना पुन्हा दिलासा मिळणार, पतधोरण समितीची लवकरच बैठक
Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दोन वेळा 25 बेसिस पॉईंटनं रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते.

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. दोन्ही वेळा प्रत्येकी 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली. यामुळं रेपो रेट 6.50 वरुन आता 6.00 टक्क्यांवर आला आहे. याचा फायदा गृहकर्जदारांना झाला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 4,5,6 जूनला होणार आहे. म्हणजेच 6 जूनला रेपो रेटची घोषणा करण्यात येईल.
25 बेसिस पॉईंट रेपो रेट घटणार?
आरबीआयच्या जून महिन्यातील पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो ,असा अंदाज अर्थतज्ज्ञांना आहे. किरकोळ महागाई सलग दोन महिन्यात 4 टक्क्यांच्या खाली राहिल्यानं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यास तो 5.75 टक्क्यांवर येऊ शकतो.
एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर गेल्या सहा वर्षात निचांकी पातळीवर आहे. एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 3.16 टक्के आहे. खाद्य पदार्थ महागाईचा दर ऑक्टोबर 2021 पासून पहिल्यांदा निचांकी पातळीवर आहे. डाळ आणि धान्याच्या किमती घटल्या आहेत. मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळं सर्व परिस्थितीचा विचार करता रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते.
नोमुराच्या एका रिपोर्टनुसार 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत महागाईचा दर 3 टक्क्यांच्या खाली राहू शकतो. तर, दुसऱ्या सहामाहीत तो 3.34 टक्के राहू शकतो. आरबीआयच्या नियमानुसार महागाईचा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. आरबीआयकडून 2025-26 मध्ये अजून 5 वेळा पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं रेपो रेट 5 टक्क्यांवर येऊ शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एप्रिल 2025 मध्ये पतधोरण जाहीर करताना सर्वसमावेशक धोरण ठेवलं होतं. त्यावेळी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानं महागाई कमी करण्याऐवजी विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका ठेवली होती.
रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्जदारांना फायदा
आरबीआयकडून जेव्हा रेपो रेट कमी केला जातो तेव्हा गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा होतो. बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात केली जाते. याचा फायदा नव्यानं कर्ज घेणाऱ्यांना होतो किंवा ज्यांनी कर्ज रेपो रेट प्रमाणं बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेलं आहे, त्यांना देखील याचा फायदा होतो.























