RBI Reop Rate : आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!
आरबीआयने यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
![RBI Reop Rate : आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा! rbi governor shaktikanta das announce current financial year monetary policy no change in repo rate rbi mpc meeting RBI Reop Rate : आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/b8393685c1bdb79509c6596f647391bb1712292265265988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आरबीआयने (RBI) यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण (RBI Monetary Policy) जाहीर केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. यंदादेखील रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.
तीन दिवस चालली बैठक
चालू आर्थिक वर्षाचे धोरण ठरवण्यासाठी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीला 3 एप्रिल रोजी सुरुवात झाली होती. आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी या बैठकीचा शेवटचा दिवस होता. बैठक संपल्यानंतर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन चलनविषक धोरणाविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळीदेखील आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कर्जधारकांना दिलासा, ईएमआय महागणार नाही
गेल्या वर्षभरपासून आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे यावेळी काय होणार? असे विचारले जात होते. रेपो रेट वाढवण्यात आला असता तर त्याची थेट झळ सामान्य कर्जधारकांना बसली असती. रेपो रेटमध्ये वाढ झाली असती तर कर्जधारकांच्या ईएमआयमध्ये वाढही वाढ झाली असती. मात्र आरबीआयने रेपो रेट जैसे थेच ठेवल्यामुळे कर्जधारकांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँक देशातील व्यापारी बँकांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाच्या रुपात पैसे देते. व्यापारी बँकांना हे पैसे परत करावे लागतात. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने पैसे देते, त्यालाच रेपो रेट म्हणतात. रेपो रेट वाढवल्यास व्यापारी बँका सामान्य लोकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करतात. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसते.
भारताकडे 645 अब्ज डॉलर्स परदेशी गंगाजळी
शक्तिकांत दास यांनी भारतील परदेशी गंगाजळीबातही सविस्तर माहिती दिली आहे. भारताच्या तिजोरीत सध्या 645.6 अब्ज डॉलर्स परदेशी गंगाजळी असल्याचं त्यांनी सांगितलं. हा आतापर्यंतचा सर्वांधिक परदेशी चलनसाठा असल्याचेही ते म्हणाले. याआधी 2021 मध्ये परदेशी चलनसाठा 642 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. नंतर युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे तसेच जागतिक पटलावर घडलेल्या घडामोडींमुळे हा चलनसाठा कमी होतो की काय, अशी चिंता लागली होती. नंतरच्या काळात हा चलनसाठा 524 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली गेला होता.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)