Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं कर चुकवणाऱ्यांना धाडली नोटिस
Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कर चुकवणाऱ्यांना नोटिस धाडल्या आहेत.
Income Tax Department Using AI : आयकर विभागानं (Income Tax Department) करदात्यांनी भरलेल्या कर परताव्याचं (Tax Return) पुनर्मूल्यांकन केलं असून करचोरांची यादी केली आहे. या करचुकवेगिरी करणाऱ्यांना आयकर विभागानं (Income Tax Department) नोटीसा धाडल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का? या नोटीसा धाडण्यासाठी आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सची मदत घेतली आहे. दरम्यान, करदात्यांनी दिलेल्या कर परताव्याचं पुनर्मूल्यांकन करताना अनेक करचुकवे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, यामध्ये धर्मांदाय ट्रस्ट आणि राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या देणग्यांमधून करदात्यांनी कलम 80G अंतर्गत कपात करण्याचा दावा केला आहे.
दरम्यान, करदाते आयकर कायदा, 1961 च्या कलम 80G अंतर्गत देणगी दिलेल्या रकमेच्या 50 ते 100 टक्के कपातीचा दावा करू शकतात.
मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाच्या रडारवर आलेली ही प्रकरण प्रामुख्यानं आर्थिक वर्ष 2019 मधील आयकर परताव्याशी निगडीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कर चुकवणाऱ्या लोकांची ओळख पटवली आहे. या करचुकवेगिरी करणाऱ्यांचं 2018-2019 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे प्रमाण त्यांनी केलेलं दान किंवा दिलेल्या देणग्यांच्या तुलनेत विषम आहे.
रिपोर्टनुसार, आयकर विभागानं पाठवलेल्या नोटीस आयकर कायदा, 1961 च्या कलम 138 आणि 148 (ए) अंतर्गत जारी करण्यात आल्या होत्या.
आयकर परताव्याचं पुनर्मूल्यांकन
प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 147 नुसार, आयकर विभागाला एखाद्या व्यक्तीनं यापूर्वी दाखल केलेल्या आयकर परताव्याचं पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी 10 वर्षांच्या आत आणि 50 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी आठ वर्षांच्या आत आयकर परताव्याचं पुनर्मूल्यांकन केलं जाऊ शकतं. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीनं जर आर्थिक वर्ष 2019 मधील व्यवहारांवरील परतावा भरला असेल, तर त्याचं पुनर्मूल्यांकन 31 मार्च 2029 पर्यंत केलं जाऊ शकतं.
कलम 80G अंतर्गत देणगीवरील वजावट
प्राप्तिकर कायद्याचं कलम 80G प्रामुख्यानं धर्मादाय देणग्यांशी संबंधित आहे. याचा उद्देश धर्मादाय देणग्या देणाऱ्या व्यक्तींना कर सवलत प्रदान करणं हा आहे. हा विभाग विशिष्ट निधी किंवा धर्मादाय संस्थांनी केलेल्या योगदानासाठी कर कपात प्रदान करतो. या कायद्यांतर्गत आयकर परतावा भरताना एखादी व्यक्ती मान्यताप्राप्त धर्मादाय संस्थेला 100 टक्के मर्यादेपर्यंत दान केलेल्या रकमेवर कर कपात म्हणून दावा करु शकते.
आर्टिफिश्यल इंटेलिजेंस म्हणजे काय?
आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिश्यल इंटेलिजेंस विज्ञानाची अशी एक शाखा आहे जिथे इंटेलिजंट मशीन बनवले जातात. आर्टिफिश्यल इंटेलिजेंस हे टॉप टेक्नॉलजीमध्ये पहिल्या क्रमांकावर येते. आर्टिफिश्यल इंटेलिजेंस म्हणजेच एखाद्या मशीनीमध्ये माणसाप्रमाणे विचार करू शकण्याची, समजू शकण्याची व निर्णय घेण्याची क्षमता विकासीत करणे. येत्या काळात आर्टिफिश्यल इंटेलिजेंस याचा वापर अनेक क्षेत्रात होणार आहे.