करोडपती व्हायचंय? मग एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर!
तुम्हाला एका कोटीचा फंड उभा करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. महागाई दराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
मुंबई : एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास दीर्घकाळासाठी तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्हाला चांगला परतावा मिळवायचा असेल तर होईल तेवढं लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा असेही सांगितले जाते. विशेष म्हणजे लवकर गुंतवणूक करून ती दीर्घकाळासाठी कायम ठेवावी, त्यामुळे एसआयपीतून चांगले रिटर्न्स येतात. दरम्यान, एक कोटी रुपयांचा परतावा हवा असेल तर आतापासून तुम्हाला किती रुपयांची एसआयपी करावी लागेल हे जाणून घेऊ या...
एका कोटीच्या फंडासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं
तुमचे एकूण उत्पन्न आणि भांडवली बाजारातील धोका लक्षात घेऊनच एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जातो. या गोष्टी लक्षात घेऊनच एका कोटीचा फंड कसा तयार करावा, त्यासाठी किती पैशांची एसआयपी करावी लागेल ते पाहू. एसआयपीच्या मदतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करत असता. दीर्घकाळासाठी ही गुंतवणूक चालू ठेवल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही एसआयपी केल्यास तुमच्या खिशावर ताण पडणार नाही. तुम्हाला एसआयपीतून एक कोटीचा फंड जमा करायचा असेल तर त्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
महागाई लक्षात घेऊनच किती एसआयपी करावी, हे ठरवा
सर्वप्रथम किती काळात एक कोटीचा फंड उभारायचा आहे, हे तुम्हाला आधी ठरवावा लागेल. निश्चित काळ न ठरवल्यास, तुम्हाला महिन्याला किती एसआयपी करावी याचा अंदाज बांधणे अवघड आहे. विशेष म्हणजे एसआयपीची रक्कम निवडताना वाढत असलेली महागाईदेखील लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही 10 वर्षात एक कोटी रुपयांचा फंड उभा करू पाहात असाल तर दहा वर्षांनंतर महागाई वाढलेली असेल. या महागाईमुळे 10 वर्षांनी तुम्हाला मिळणाऱ्या एक कोटी रुपयाचे मूल्य हे कमी झालेले असेल. महागाईचा दर 7 टक्क्यांनी वाढतोय, असे गृहित धरले तर दहा वर्षांनी खूप महागाई वाढलेली असेल. म्हणजेच महागाईचा दर लक्षात घेता तुम्हाला एक कोटी नव्हे तर 1,96,71,514 रुपयांची गरज लागेल. याच हिशोबानुसार किती एसआयपी करावी, हे समजून घेऊ.
एवढी करावी लागणार एसआयपी
तुम्ही केलेल्या एसआयपीतून वर्षाला साधारण 15 टक्क्यांचा परतावा मिळतोय, असे या ठिकाणी गृहित धरुया. तुम्हाला दहा वर्षात 10 कोटी रुपये मूल्य असलेला फंड मिळवायचा असेल तर आतापासूनच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 70,500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. महिन्याला एवढी गुंतवणूक केल्यास तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे दहा वर्षांत 1,96,45,338 रुपये होतील.
हेही वाचा :
SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!
50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर!