Google Pay Laon : गुगल पेवरुन कर्ज घेण्याचा विचार करताय? अॅपवरुन कर्ज घेताना सतर्कता गरजेची, फायदा अन् नुकसान, महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या...
Google Pay Loan : गुगल पे वरुन कर्ज घेताना सोपी प्रक्रिया असल्यानं अनेकजण कर्ज काढतात. या प्रकारचं कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली : सध्या डिजिटल पेमेंटसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. भारतात प्रत्येक महिन्याला यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. यूपीआय पेमेंट सेवा देणाऱ्या गुगल पे अॅपवरुन आता पैसे पाठण्यासोबत, बिल भरणे, रिचार्ज करणे यासह वैयक्तिक कर्ज देखील मिळतं. गुगल पेवरुन अनेक जणांकडून कर्ज देखील घेतलं जातं. मात्र, हे कर्ज घेण्याचे फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टी देखील माहिती असणं आवश्यक आहे.
गुगल पेवरुन वैयक्तिक कर्ज सोप्या पद्धतीनं मिळं. या अॅपनं अनेक बँकांशी आणि वित्तीय संस्थांसोबत भागीदारी केलेली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इतर नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांचा समावेश आहे. अॅपचा वापरकर्ता कर्ज विभागात जाऊन त्याच्या आवश्यकतेनुसार रक्कम टाकून आणि परतफेडीचा कालावधी नोंदवून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करु शकता. काही मिनिटांमध्ये अर्ज मंजूर केला जातो. मात्र, यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं आणि कागदपत्रं देखील पूर्ण असणं आवश्यक आहे.
गुगल पेद्वारे 10 हजार रुपये 8 लाख रुपांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. या कर्जाचा व्याज दर 10.99 पासून 36 टक्क्यांपर्यंत असतो. ही प्रक्रिया डिजीटल असते. तुम्हाला बँकेत जावं लागत नाही. कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात वर्ग होते. यामुळं अनेक जण गुगल पेद्वारे मिळणाऱ्या कर्जासाठी अर्ज करु शकतात.
नुकसान आणि जोखीम
गुगल पे वरुन कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी अशली तरी याचे काही तोटे देखील आहेत. गुगल पेवरुन घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याज दर अधिक असू शकतो. मनीकंट्रोलच्या वेबसाईट नुसार काही एनबीएफसी ज्या गुगल पे सोबत करार करतात त्यांचे व्याज दर इतर बँकांच्या तुलनेत अधिक असतात. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास जादा व्याज दर आकारला जातो. त्यामुळं ईएमआय अधिक द्यावा लागू शकतो.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुगल पे कर्ज देत नाही. गुगल पे इतर कर्जदात्यांना कर्जदारांशी जोडण्याचं काम करते. कर्जाचे नियम आणि अटी त्या कर्ज देणाऱ्या संस्थेवर अवलंबून असतात. तुम्ही जर कर्ज घेताना नियम आणि अटी वाचल्या नाहीत तर नंतर त्रास होऊ शकतो.
गुगल पेवुन कर्ज काढताना काही गोष्टी कर्जदारांकडून दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. काही वेळा कर्जाची ऑफर दिलेली असते त्यामध्ये प्रोसेसिंग फी कर्ज वितरित करण्यापूर्वीच वजा केलेली असते. कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो. प्रोसेसिंग फी कर्ज रकमेच्या 1 ते 3 टक्के असू शकतं. जी कर्ज घेण्यापूर्वीच त्या रकमेतून वजा केली जाते. एखाद्यावेळी तुम्ही कर्जाची वेळेपूर्वी परतफेड करायला गेल्यास काही वित्तीय संस्थांकडून चार्जेस आकारले जातात. त्यामुळं गुगल पेवरुन कर्ज घेण्यापूर्वी त्यासंदर्भातील नियम व अटी वाचून घेणं गरजेचं आहे.























