(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर असताना सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा भाव काय?
आज पुन्हा एकदा सोन्याचा दर वाढला आहे. सोने 450 रुपये प्रतितोळा रुपयांनी महागले आहे. चांदीचा दरही वधारला असून चांदी जीएसटीसह 85 हजार रुपयांच्या पार पोहोचली आहे.
मुंबई : येत्या 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणे हे शुभ मनले जाते. त्यामुळे या वर्षीदेखील लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या दागिन्यांच्या रुपात सोन्याची खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात सोनं चांगलंच महागलं होतं. दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळाळी आली आहे. सोन्याच्या दरात 450 तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोने जीएसटीसीसह आता 73 हजार 799 रुपयांवर आणि चांदी जीएसटीसह 85 हजार 490 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
अक्षय्यतृतीये आधीच सोने , चांदी पुन्हा महागले
येत्या 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा महागले आहे. सोन्याच्या दरात 450 रुपयांची, तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काळात किमान दोन महिने तरी लग्नसराई नाही. दुसरीकडे सोने, चांदीचे दर गगनाला पोहोचल्यामुळे सोने, चांदीच्या मागणीत काहीशी घट झाली आहे. यामुळे सात दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात 1800 रुपयांची, तर चांदीच्या दरात 3 हजारांची घट झाली होती. सोन्याचा दर 20 एप्रिलला 76 हजार 14 रुपये होता, तर चांदीनेही 86 हजार 520 रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला होता. यामुळे सोने, चांदीचे दागिने विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले.
गुढीपाडव्यालाही सोन्याच्या दरात वाढ
गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह 74 हजार 366 रुपयांवर होता. चांदीच्या दरातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी 85 हजार 387 रुपयांवर आली होती. सोन्यातील दरवाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्मी घट झाली होती. यामुळे सूवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला होता.
दहा दिवसांपूर्वी सोन्याचा दर 76 हजार 14 रुपये
30 एप्रिलला सोन्याचा दर जीएसटीसह 74 हजार 160 रुपये प्रतितोळा, चांदी जीएसटीसह 83 हजार 430 रुपये प्रतिकिलो होती. दहा दिवसांपूर्वी सोन्याचा दर 76 हजार 14 रुपये (प्रतितोळा), तर चांदी 86 हजार 520 रुपये (प्रतिकिलो जीएसटीसह) होते. आज सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ होऊन सोने जीएसटीसी 73 हजार 799 रुपयांवर पोचले, तर चांदी जीएसटीसह 85 हजार 490 रुपयांपर्यंत पोचली आहे.
हेही वाचा :
'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स
कॅप्टन कुलची 'ई- मोटोरॅड'मध्ये मोठी गुंतवणूक, पण ही कंपनी नेमकं करते तरी काय?
नावाला पेनी स्टॉक, पण शेअर बाजारावर सुस्साट, 'या' दहा कंपन्यांत छप्परफाड कमाई!