Urja Global Tesla : Tesla साठी भारतीय कंपनी बॅटरी बनवणार, कराराची बातमी समजताच Urja Global Ltd च्या शेअर्समध्ये तेजी
Urja Global Tesla : ऊर्जा ग्लोबल लिमिटेडच्या शेअर्समध्ये ही तेजी एका करारमुळे आली आहे. कंपनीने बॅटरीची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी टेस्ला पॉवर यूएसएसोबत करार केला आहे.
Urja Global Tesla : बॅटरी आणि इलेक्ट्रिक टू व्हीलरची निर्मिती करणाऱ्या एका छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये दमदार वाढ झाली आहे. ऊर्जा ग्लोबल लिमिटेड (Urja Global Limited) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचे शेअर (Shares) आज (12 जून) 20 टक्के अप्पर सर्किटसह 12.74 रुपयांवर पोहोचले आहेत. ऊर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर मागील आठवड्यात शुक्रवारीही 20 टक्क्यांनी वाढून 10.62 रुपयांवर बंद झाले होते. ऊर्जा ग्लोबल लिमिटेडच्या शेअर्समध्ये ही तेजी एका करारमुळे आली आहे. कंपनीने बॅटरीची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी टेस्ला पॉवर यूएसएसोबत (Tesla Power USA) करार केला आहे. 7 जून रोजी ऊर्जा ग्लोबल लिमिटेडने टेस्ला पॉवर यूएसएसोबत हा करार केला आहे.
एलॉन मस्कच्या टेस्लाशी संबंध नाही
बर्याच गुंतवणूकदारांना वाटलं की टेस्ला पॉवर यूएसए ही कंपनी एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मिती करणारी टेस्ला आहे. त्यामुळे त्यांनी 12.70 रुपये प्रति शेअर दराने 20 टक्के वाढीसह शेअर खरेदी केला. परंतु टेस्ला पॉवर यूएसएचा एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला या कार निर्मिती करणाऱ्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. टेस्ला पॉवर ही कंपनी चारचाकी कारच्या बॅटरी, इन्व्हर्टर बॅटरी आणि टू व्हीलर बॅटरी बनवते.
ऊर्जा ग्लोबलच्या शेअर्सच्या अपर सर्किटवर प्रतिक्रिया देताना, गुंतवणूकदार असलेले विजय केडिया यांनी ट्वीट केलं आहे. ते लिहितात की, सूचीबद्ध भारतीय कंपनीचं "टेस्ला यूएसए बरोबर 'टायअप' ही बातमी वाचून मला आनंद झाला. मी थोडा अभ्यास केला आणि मला आढळलं की ही कंपनी एलॉन मस्कची टेस्ला नाही, तर टेस्ला नावाने दिल्लीतील प्रमोटर्सच्या यूएसए उपकंपनीशी संबंधित आहे."
I am thrilled to read a news about a listed Indian company “tied up” with Tesla usa. I did some homework and found It's not Elon musk's tesla, it actually belongs to a Delhi based promoter's usa subsidiary in the name of Tesla. Stock is in upper circuit. Long live bull market.
— Vijay Kedia (@VijayKedia1) June 12, 2023
टेस्ला पॉवर ब्रॅण्डअंतर्गत ऊर्जा ग्लोबल बॅटरीची निर्मिती करणार
टेस्ला पॉवर यूएसए ब्रॅण्ड अंतर्गत त्यांना बॅटरीची निर्मिती आणि पुरवठा करायचा आहे, असं ऊर्जा ग्लोबल लिमिटेडने सांगितलं. कंपनीने शेअर होल्डर्सना माहिती दिली की ऊर्जा ग्लोबल लिमिटेडने 7 जून 2023 रोजी टेस्ला पॉवरसोबत एक करार केला आहे. टेस्ला पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत केलेल्या कराराअंतर्गत टेस्ला पॉवर एएसए ब्रॅण्ड अंतर्गत बॅटरीची निर्मिती आणि पुरवठा केला जाणार आहे. ऊर्जा ग्लोबल ही कंपनी भारतात बॅटरीच्या निर्मिती आणि पुरवठा करणारी कंपनी असेल."
5 दिवसात ऊर्जा ग्लोबल कंपनीच्या शेअरमध्ये 55 टक्क्यांची वाढ
या कराराबाबत समजताच गुंतवणूकदारांचा रस वाढला. त्यानंतर अचानक शेअर्सची मागणी वाढली. आज 25,57,861 शेअर्सची खरेदी झाली. मागील पाच दिवसात ऊर्जा ग्लोबल लिमिटेडच्या शेअरमध्ये 55 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ऊर्जा ग्लोबलचे शेअरची किंमत 6 जून 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 8.18 रुपये होती. तर आज म्हणजेच 12 जून 2023 रोजी बीएसईमध्ये शेअरची किंमत 12.74 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय गेल्या महिन्याभरात ग्लोबल शेअरमध्ये सुमारे 64 टक्के उसळी पाहायला मिळाली.