(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने गाठला उच्चांक; सात वर्षातील सर्वाधिक दर
Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला असून मागील सात वर्षातील हा सर्वाधिक दर आहे.
Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने गाठला उच्चांक; सात वर्षातील सर्वाधिक दर आधीच महागाईत होरपळत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची दाट शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96.16 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे.
कच्चे तेल आणखी महागणार?
आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या घडामोडी आणि वाढती मागणी या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्ष 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 18 ते 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
कोरोना महासाथीचा जोर ओसरल्यानंतर वाढत्या मागणीमुळे कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती. आता प्रति बॅरल 96 डॉलर दर सुरू आहे. याचाच अर्थ दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार?
कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. Goldman Sachs च्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 100 पर्यंत पोहोचू शकते आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 105 च्या पुढे जाऊ शकते. त्याच वेळी, जेपी मॉर्गन 2022 मध्ये $ 125 प्रति बॅरल आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करत आहे.
सरकारचा तेल कंपन्यांवर दबाव?
सरकारच्या दबावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नसल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र निवडणुकीनंतर तूट भरून काढण्यासाठी किमान 5 ते 10 रुपयांनी इंधन दरवाढ होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील 100 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.