महागाईचा भडका उडणार? आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ
Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात मंगळवारी वाढ झाल्याचे दिसून आले.
Crude Oil Price : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची चिंता कमी झाल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत मंगळवारी जवळपास 5 टक्के वाढ झाली. कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणामी इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये क्रूड ऑईलच्या दरात सातत्याने वाढ होत राहिल्यास त्याचा परिणाम इंधन दरावरही दिसून येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 75.44 डॉलर प्रति बॅरल इतका झाला. सोमवारीदेखील 4.6 टक्के वाढ झाली होती. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडचे दर 72.05 डॉलर प्रति दर इतके झाले होते.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस कमी प्रभावी ठरू शकतील असे वृत्त होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार निर्बंध लागू करू शकते अशी अटकळ बांधली जात होती. त्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात तेलाच्या किमती घसरल्या होत्या. मात्र, ओमायक्रॉनबाबत सध्या तरी चिंतेचे कारण नसल्याचे वक्तव्य शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून आल्यानंतर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. ट्रेडिशन एनर्जीचे विश्लेषक गॅरी कनिंगहॅम यांनी म्हटले की, येत्या सहा ते 12 महिन्यात तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. चीनने देखील नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलची आयात वाढवली होती.
कच्च्या तेलाचा महत्त्वाचा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने रविवारी क्रूड तेलाच्या दरात वाढ केली होती. मागील आठवड्यात तेल उत्पादक देश आणि त्यांचे सहकारी देश असलेल्या OPEC+ या गटाने दररोजचे तेल उत्पादन वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. दरम्यान, आण्विक कार्यक्रमामुळे इराणवर असलेल्या निर्बंधाचा परिणामही आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. इराणकडून क्रू़ड ऑईलच्या पुरवठ्यात घट झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Fuel Price : जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल; भारतातील कोणतं शहर?
- Fuel Price : क्रूड ऑइलच्या दरात घट, तरीही भारतात इंधन दर का घटेना? जाणून घ्या कशी होईल दर कपात
- ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे का होतात रक्ताच्या गुठळ्या? शास्त्रज्ञांनी सांगितले कारण